आगळीवेगळी सौंदर्यस्पर्धा पाहण्यासाठी तुफान गर्दी
कुण्या एखाद्या ‘फॅशन वीक’मध्ये रॅम्पवरून ‘कॅटवॉक’ करत पुढे येणारी सौंदर्यवती न्याहाळण्यासाठी जमणारी गर्दी आता नेहमीचीच झाली आहे. मात्र, रविवारी डोंबिवलीत रंगलेल्या सौंदर्यस्पर्धेत आवर्जून उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांनी नजाकतभरा ‘कॅटवॉक’ पाहण्याऐवजी रूबाबदार ‘डॉगवॉक’ अनुभवला. निमित्त होते श्वानांच्या सौंदर्यस्पर्धेचे. संगीताच्या तालावर रॅम्पवरून चालणाऱ्या श्वानांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. थंड प्रदेशातील न्यू फाऊंड लॅण्ड, सेंट बर्नाडर तसेच वाळवंटात आढळणारा अफगाण हाउंड डॉग, सायबेरीयातील सायबेरीयन हास्की हे पाळीव श्वान यंदा या स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र सर्वाधिक पसंती रॉटविलरला मिळाली. उल्हासनगर येथून आलेला सेंट बर्नाड या स्पर्धेतील ‘किंग ऑफ शो’ तर कल्याणची चिहुहा ‘क्वीन ऑफ शो’ ठरली.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाऊन आणि प्रिमीयम पेट्स यांच्या वतीने रविवारी येथील स.वा.जोशी शाळेच्या मैदानात पाळीव श्वानांची सौंदर्य स्पर्धा भरविण्यात आली होती. गेल्या सहा वर्षांपासून डोंबिवलीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, रायगड या भागातून ३० प्रजातीच्या साधारण २५० हून अधिक श्वानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात नेपोलियन मॅस्टिफ, रॉटविलर, लॅब्रेडोर, जर्मन शेफर्ड, पग, हॉवर्ड, गोल्डन रिट्रिव्हर, डॅलमिशन, ल्हासा, डॉबरमॅन, पॉमेरिअन, ग्रेटडेन, क्रॉकर स्पॅनिअल अशा विविध जातींचा समावेश होता. यावेळी श्वानांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
शहरातील प्राणीप्रेमींना वेगवेगळ्या प्रजातीचे श्वान पहाण्याची संधी या स्पर्धेतून मिळत असल्याने दरवर्षी नागरिक या स्पर्धेला गर्दी करतात. येथे विविध प्रजातींच्या श्वानांची माहिती होते. तसेच त्यांच्या सवयी, आवडी निवडी, त्यांची काळजी कशी घ्यावी याची माहितीही देण्यात येत असल्याचे प्रकल्प अध्यक्ष अमर बनसोडे यांनी सांगितले. या श्वान स्पर्धेची महती आता परदेशातही पोहोचली असून यंदा जर्मन येथील काही नागरिक खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे ठाणे जिल्हा प्रमुख डॉ. चंद्रशेखर कोलवेकर यांसह अभिनेता अिजक्य देव यांनी उपस्थिती
लावली होती. ‘अशी स्पर्धा कोठे पहावयास मिळत नाही. पुढील वर्षी ही स्पर्धा पहाण्यास नक्कीच आवडेल,’ अशी प्रतिक्रिया अजिंक्य देव यांनी दिली.