ठाणे : ठाणे येथील मनोरमानगर भागातील एका मोठ्या नाल्यात शनिवारी सकाळी एक श्वान पडल्याचा प्रकार उघडकीस आला. नाल्याची भिंती उंच असल्यामुळे त्याला नाल्याबाहेर येणे शक्य होत नव्हते. याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव तासाभराच्या प्रयत्नानंतर श्वानाला नाल्याबाहेर काढले.

ठाणे येथील मनोरमानगर भागात मोठा नाला आहे. नाल्याच्या परिसरातून जात असलेला एक श्वान तोल जाऊन नाल्यात पडला. त्याने नाल्याबाहेर पडण्याचे प्रयत्न केले. पण, नाल्याच्या भिंती उंच असल्यामुळे त्याला नाल्याबाहेर पडणे शक्य होत नव्हते. त्याची नाल्याच्या बाहेर पडण्याची धडपड सुरूच होती. ही बाब एका नागरिकाच्या निदर्शनास आली आणि त्याने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला याबाबत माहिती दिली. यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेऊन श्वानाला नाल्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले खरे. पण, त्यात पथकाला यश येत नव्हते. जवळपास तासभर हे प्रयत्न सुरू होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर तासाभरानंतर श्वान पथकाने नाल्यात उतरून श्वानाला पकडले आणि त्यानंतर त्याला नाल्याबाहेर काढण्यात आले. श्वान पथकाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करून नाल्यामध्ये पडलेल्या कुत्र्याची सुखरूप सुटका केली. यात श्वानाला दुखापत झालेली नाही. तसेच बचाव पथकातील कुणालाही दुखापत झालेली नाही. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग ठाणे शहात आपत्तीच्या काळात मदतकार्य करण्यात पुढे असते. याशिवाय, जखमी प्राणी, पक्षी आणि श्वानांच्या बचावासाठीही पुढे असते, हे अनेकदा दिसून आलेले असून शनिवारी ही बाब पुन्हा एकदा दिसून आली. त्यामुळे या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.