डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर परिसराचा वीज पुरवठा गेल्या १७ तासापासून बंद असल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार एमआयडीसी परिसराचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने या भागात पर्यायी वीज पुरवठ्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या भागातील रहिवाशांनी केली आहे.

डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर भागाचा वीज पुरवठा सोमवारी संध्याकाळी बंद पडला. अर्धा एक तासाने वीज पुरवठा पूर्ववत होईल, अशी रहिवाशांची अपेक्षा होती. परंतु, रात्रभर वीज पुरवठा बंद राहिला. अनेक रहिवाशांनी याविषयी महावितरणच्या स्थानिक, वरिष्ठांना कळविले. वीज पुरवठा बंदचे कोणतेही कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात येत नव्हते. फक्त वीज पुर‌वठा का बंद पडला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे, असे उत्तर अधिकारी देत होते. मुसळधार पाऊस, त्यात घरात, रस्त्यावर वीज नसल्याने रहिवाशांची घरकोंडी झाली.

बहुतांशी रहिवाशांना घरात पंखा, वातानुकुलन यंत्र असल्याशिवाय आराम पडत नाही. अशा रहिवासी, लहान बालके, रुग्णांचे वीज नसल्याने सर्वाधिक हाल झाले. एमआयडीसीतील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार वाढले आहेत. एमआयडीसीत अनेक रुग्णालये, शाळा आहेत. वीज पुरवठा नसला की रुग्णालयांना पर्यायी व्यवस्थेवर वीज पुरवठा सुरळीत ठेवावा लागतो. बहुतांशी शाळा अलीकडे डिजिटल झाल्या आहेत. वीज पुरवठ्या शिवाय डिजिटल यंत्रणेतून शिक्षकांना शिकवता येत नाही. शाळांचीही वीज पुरवठा नसला की कोंडी होते, असे या भागातील शाळा चालकांनी सांगितले.

वीज पुरवठा बंद असल्याने सोसायटी, बंगल्यांचे पाणी पुरवठा पंप बंद अवस्थेत होते. त्यामुळे रहिवाशांना एमआयडीसीकडून येणारे पाणी घेता आले नाही. वीज पुरवठा कधी पूर्ववत होणार या विचार चक्रात रहिवासी असताना मंगळवारी एमआयडीसीने आज पाणी येणार नाही असे जाहीर केल्याने रहिवाशांच्या संतापात आणखी भर पडली. एमआयडीसी, मिलापनगर परिसरातील बहुतांशी वर्ग डाॅक्टर, वकील, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागायला कोणीही नसल्याने त्याचा गैरफायदा अधिकारी घेत आहेत, असे या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयडीसीची परिसराचा वीज पुरवठा रात्रीपासून खंडित झाला आहे. कोठे बिघाड झाला आहे याचा शोध महावितरणचे अधिकारी घेत आहेत. हे प्रकार एमआयडीसीत वारंवार घडत आहेत, असे या भागातील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले. नियमित वीज देयक भरणा करूनही रहिवाशांना सातत्याने वीज पुरवठा बंद ठेऊन काळोखात ठेवण्यात येत असेल तर यापुढे वीज देयक न भरण्याचा निर्णय रहिवासी घेतील, अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांनी दिल्या. महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवाड यांना संपर्क केला. त्यांनी आपण शहराच्या बाहेर सुट्टीवर आहोत. उपअभियंता हटकर यांना संपर्क करा असे सांगितले. हटकर यांना सतत संपर्क करूनही त्यांचा मोबाईल बंद होता.