आशिष धनगर / भगवान मंडलिक

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्यामुळे चिंतेचे मळभ कायम असताना डोंबिवलीतील नोकरदारांना एसटी बसची गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे मुंबईचा प्रवास जोखमीचा ठरत आहे.

निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही शहरांच्या विकासासाठी काही हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात रडतखडत सुरू असलेली विकासकामे, अपुऱ्या सुविधा, वाहतूक कोंडी यामुळे येथील नोकरदार हैराण झाला आहे. जेमतेम १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांची रखडपट्टी नोकरदारांना करोना काळात त्रासदायक ठरू लागली आहे.

टाळेबंदीतून शिथिलता मिळताच डोंबिलीकर मुंबई ठाण्यातील कार्यालये गाठण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. मध्य रेल्वेची उपनगरीय लोकलसेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू असल्यामुळे नोकरदारांना रस्तामार्गे कार्यालय गाठावे लागत आहे. खासगी वाहनाने किंवा एसटीने प्रवास करताना नोकरदारांवर करोना संसर्गाच्या भीतीचे दडपण आहे. दिवसभरातील पाच ते सहा तासांचा प्रवास त्याच्यासाठी जोखमीचा ठरत आहे. शहराबाहेर पडण्यासाठी असलेले महत्त्वाचे रस्ते आणि उड्डाणपुलांची कामे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रडतखडत सुरू आहेत.

कोंडीत वाढ

डोंबिवली शहरातून बाहेर पडण्यासाठी कल्याण-शीळ रस्ता हा अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याच्या रुंदीकरणाचे आणि कॉंक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. पुलाच्या कामाचा वेग संथ असल्यामुळे अनेक ठिकाणी अरुंद आणि उंच-सखल झालेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. डोंबिवलीतून कल्याणमार्गे मुंबई-नाशिककडे जाणारा मार्ग पत्रीपूलधोकादायक झाल्याने २०१८ पासून बंद आहे. या पुलाच्या कामातही गती नाही. या पुलाच्या उद्घाटनाचे वेगवेगळे मुहूर्त आतापर्यंत सांगितले गेले. प्रत्यक्षात त्याचे काम ५० टक्केही पूर्ण झालेले नाही.

दुर्गाडी पुलाचीही अशीच अवस्था आहे. ११० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या दुर्गाडी पुलाच्या उभारणीचे कामही राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येत आहे. या पुलाचे काम २०१६ पासून सुरू झाले ते २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मध्यंतरी ठेकेदार आणि राज्य रस्ते विकास महामंडाळामध्ये काही वाद झाल्याने जुना ठेकेदार हे काम सोडून गेला. सध्या नव्या ठेकेदाराकडून या पुलाचे ६० कोटींचे उर्वरित काम संथ गतीने सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यासही आणखी सहा महिन्यांहून अधिक काळ लागण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक महामार्ग गाठण्यासाठी डोंबिवलीकरांचा द्राविडी प्राणायम टळावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे २२५ कोटी खर्च करून मोठागाव-माणकोली उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम २०१६ पासून सुरू आहे. भूसंपादनामुळे पुलाचे काम रखडले आहे.

शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेतर्फे १० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारा कोपर उड्डाण पूल आणि या पुलाला पर्याय म्हणून ४२ कोटी खर्च करून उभारण्यात येणारा कोपर उड्डाण पूल यांचीही कामेही दीड वर्षांपासून प्रलंबित आहेत. डोंबिवलीकरांची अशी चोहो बाजूने कोंडी झाली आहे.

..गंभीर रुग्णांचे हाल

डोंबिवली शहरातून बाहेर जाण्यासाठीच्या सर्वच मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्यामुळे करोना किंवा अन्य आजारांच्या गंभीर रुग्णांना मुंबई किंवा ठाण्यातील रुग्णालयांमध्ये दाखल करतानाही अडचणी येत आहेत. रुग्णवाहिकाही अनेकदा कोंडीत अडकतात. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासही विलंब होतो. मात्र, शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी वाहतूक  कोंडीच्या समस्येवर मौन बाळगून आहेत.

अंतर नियमाचा फज्जा

* लोकल रेल्वेसेवा बंद असल्यामुळे डोंबिवलीतील नोकरदारवर्गाला एसटीने प्रवास करावा लागत आहे.

* या प्रवासासाठी दररोज दीडशे ते दोनशे रुपयांहून अधिक खर्च येत असल्याने त्यांचा मासिक प्रवासखर्चही वाढला आहे.

* शिवाय, या बसगाडय़ांची संख्या मर्यादित असल्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी गाडय़ांमध्ये गर्दी होत असल्यामुळे अंतर नियम पाळणे कठीण जात आहे.