डोंबिवली – भारतीय स्वातंत्र्यांची ७५ वर्ष बघता बघता निघून गेली. आता स्वातंत्र्य वृध्द झाले आहे. तरीही नागरी समस्यांचे डोंगर कमी होताना दिसत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवून दिले. राष्ट्रपुरूषांनी स्वातंत्र्य दिले. मग, आता सुराज्य दिन आणण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न करत डोंबिवलीतील उपक्रमशील आणि मुल्याधिष्ठीत शिक्षण देणाऱ्या मानपाडा उंबार्ली येथील विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलकावर सुराज्यापेक्षा राज्याचे कु-राज्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, कर्तव्यदक्ष नागरिकांवर काव्यमय शैलीत बोचरी टीका केली आहे.

आपला देह झिजून, घरा दारावर तुळशीपत्र ठेऊन आपल्या राष्ट्रपुरूषांनी स्वराज्य, स्वातंत्र्यासाठी जीवाचे रान केले. म्हणून आपण आता आपली सुखासिन वाटचाल करत आहोत. स्वातंत्र्याचा ७५ वर्षाचा प्रवास बघता बघता निघून गेला आहे. तरीही नागरी समस्यांचे डोंगर कमी होताना दिसत नाहीत. सुराज्य राहिले बाजुलाच. मग ही सुराज्य आणण्याची, आणून देण्याची जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी दिली त्यांनी काय केले? मतदार नागरिक म्हणून आपण त्यांना काय प्रश्न केले? या पाठपुराव्यासाठी आपण किती झिजलो?

जाती, पाती, धर्म, पंथ, हत्ती, कबुतरे, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, मटण मांस विक्री बंदी या सगळ्या फसव्या वादात आणि फासात कोण कोणाला ओढत नेत आहे. सामाजिक, नागरी समस्यांचे काय? आपल्या सोयीप्रमाणे नागरिकांना कोण पळवायला लावतय. विचार न करता त्या सोयीच्या मागे धावणारे आपण आता कुठे आहोत? त्यामुळे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात या सर्व गोष्टींचा विचार सुजाण नागरिक म्हणून, सुजाण लोकप्रतिनिधी म्हणून आपण कधी करणार आहोत की नाही, असा प्रश्न विद्यानिकेतन शाळेच्या काव्यमय शैलीतील फलकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

७५ वर्षात खड्डे, दलदल, कचरा, दुर्गंधी हेच चित्र दिसणार असेल तर आता सुजाण नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही, अशा कानपिचक्या या फलकाच्या माध्यमातून मिरविणाऱ्या कर्तव्यदक्ष नागरिकांना देण्यात आल्या आहेत. कोणाकडुनही अपेक्षा राहिल्या नसताना आता नागरिकांनीच पुढाकार घेऊन सुराज्याचे स्वप्न साकार करायचे असेल तर पुढील सुत्रांचा अवलंब करावा लागेल असे फलकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

सुराज्य येण्यासाठी काय करावे हे सांंगताना, विद्यानिकेतन शाळेच्या फलकावर म्हटले आहे, की स्वताच्या स्वार्थाचा जो लोकप्रतिनिधी फक्त विचार करतो. त्याला कधीही निवडून देऊ नका. सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास निष्क्रिय भूमिका घेणारा, लोकांवर डोळे वटारणारा अधिकारी तात्काळ हटविला जाईल यासाठी पुढाकार घ्यावा.

संसद म्हणजे आखाडा या विचारातून निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला आपल्या मतांच्या माध्यमातून इंगा दाखवावा. जातीपातीचे राजकारण करून दंंगेधोपे करून आपली पोळी भाजून घेणाऱ्यांना तुरूंगात खडी फोडण्यास धाडावे. एकाच घरात पिढ्यान पिढ्या राजसत्ता उपभोग घेत असेल तर लोकशाहीची थट्टा टाळण्यासाठी या पीढीजात राजसत्तेला मग घरी बसवावे. हे सर्व करण्यासाठी जनता जेव्हा सुजाण, निर्भय होईल तोच लोकशाहीचा खरा सुदिन असेल.