डोंबिवली – गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला असतानाच गणेश भक्तांची फसवणूक करणाऱ्या गणेश मूर्तिकार प्रफुल्ल पंढरीनाथ तांबडे यांच्याविरुद्ध गणेश भक्तांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीत पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील आनंदी कला केंद्राचे मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे अचानक पसार झाल्याने गणेशभक्त मोठ्या अडचणीत सापडले. आयत्यावेळी गणेश मूर्ती कुठून आणायची असा प्रश्न भाविकांना पडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पसार झालेल्या मूर्तिकाराला शोधण्यासाठी तपास चक्रांना वेग दिला आहे. आनंदी कला केंद्रात गणेशाच्या मूर्ती बनवून तेथेच त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मागील तीन महिन्यांपासून या केंद्रात गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू होते.
गणपतीच्या आदल्या दिवशी सोमवारी रात्रीपासून या केंद्राचे मूर्तिकार प्रफुल्ल परशुराम तांबडे अचानक बेपत्ता झाले त्याच्या आनंदी कला केंद्रात मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गणेशमूर्तीची नोंदणी केली होती. मात्र अधिक संख्येने घेऊन एकट्याने काम करण्याचा भार पेलता न आल्याने तो पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर गणेशभक्तांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक जणांचे नोंदणी केल्याचे पैसे अडकले. मूर्ती मिळावी म्हणून भाविकांना कारखान्यातून हाताला लागेल ती मूर्ती घेऊन जावी लागली. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच मंगळवारी सकाळी अनेक गणेशभक्त घटनास्थळी दाखल झाले. मूर्तिकार प्रफुल्ल तांबडे गायब झाल्याचे लक्षात येताच गणेशभक्तांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली. विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिनार मैदानावरील मैदानावरील आनंदी कला केंद्राचे चालक प्रफुल्ल परशुराम तांबडे मूर्तिकार गणपतीच्या मूर्ती तयार करून तेथेच विक्री करत होते. त्यांनी गणेश मूर्तीसाठी १५०१ रूपये गणेश भक्तांकडून आगाऊ घेऊन नोंदणी केलेल्या ३५०० रूपये किंमतीच्या गणेश मूर्तीचे काम पूर्ण करून न देता आगाऊ रक्कम घेऊन सदर रकमेच्या अपहार करून कुठेतरी पळून गेला. या संदर्भात मूर्तींच्या खरेदीदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णूनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१८ (२) अन्वये दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या प्रफुल्ल तांबडे याने अनेक गणेश मूर्तींचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.
दरम्यान यंदा लवकर आलेला गणेशोत्सव. पीओपी ची माती मिळण्यात अडचणी, कारागिरांचे कारागिरांचे वाढलेले मजुरीचे दर त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असावा अशी शक्यता काही ज्येष्ठ मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.