डोंबिवली येथील एमआयडीसीतील एम. डी. ठाकूर मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डाॅ. हर्षवर्धन दिलीप ठाकूर आणि त्यांच्या दोन भागीदार, सल्लागारांना कर्ज देण्याच्या बहाण्याने त्यांची एक कोटी आठ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत तमीळनाडू राज्यातील चेन्नई येथील मे. नारीऑक्स होल्डींग, मे. क्रोना ग्रोथ कंपनीच्या पाच संचालकांनी ही फसवणुक केली आहे.

हेही वाचा >>>कल्याण पूर्व आडिवली ढोकळीमध्ये मलनिस्सारणाचे पाणी रस्त्यावर वाहन चालक, रहिवासी त्रस्त

डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांनी या फसवणूक प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. मे. नारीऑक्स होल्डींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे (चेन्नई) संचालक, मे. क्रोना ग्रोथ कंपनीचे संचालक कृष्णन अय्यपन, बलराज अनिता, एस. कुमार, भास्कर, शेखर अशी आरोपींची नावे आहेत.

डाॅ. हर्षवर्धन ठाकूर, अनिल राजाराम धमाले, हेमंत पांडुरंग देशमुख, डाॅ. ठाकूर यांचे सल्लागार अशी चार जणांची फसवणूक झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये तक्रारदार डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांना आरोपी कंपनीचे संचालकांनी १० कोटी रुपये कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. या कर्ज मंजुरीच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपी कंपनीच्या संचालकांनी डाॅ. ठाकूर यांना काही रक्कम भरणा करण्यास सांगितले. डाॅ. ठाकूर यांनी टप्प्याने आरोपींच्या बँक खात्यात एकूण ८२ लाख ५० हजार रुपये जमा केले. कर्ज मंजुरीसाठीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी रक्कम भरणा करुनही कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दोन वर्ष उलटत आले तरी कर्ज मिळत नाही म्हणून म्हणून डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांनी चेन्नईतील कंपन्यांच्या संचालकांकडे पैसे परत मिळण्यासाठी तगादा लावला. सततच्या पाठपुराव्यानंतर आरोपी संचालकांनी डाॅ. हर्षवर्धन यांना ३० लाख ३० हजार रुपये परत केले.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील नांदिवली स्वामी समर्थ मठ भागात रस्त्यावरील धुळीने नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित ५२ लाख २० हजाराची रक्कम परत करण्यासाठी तगादा लावूनही ती रक्कम आरोपींनी परत केली नाही. तसेच, डाॅ. हर्षवर्धन यांचे मित्र हेमंत पांडुरंग देशमुख यांची या व्यवहारात ३६ लाख ९० हजार रुपये, अनिल राजाराम धमाले यांची १७ लाख ५० हजार रुपये आणि डाॅक्टरांचे सल्लागार यांची दोन लाखाची रक्कम अडकून पडली. ही रक्कम परत मिळावी म्हणून विविध प्रकारे प्रयत्न करुनही आरोपी कंपनीच्या संचालकांनी त्यास दाद दिली नाही. अखेर आपली आणि भागीदारांची मे. क्रोना, मे. नारीऑक्स कंपनीच्या संचालकांनी फसवणूक केल्याची खात्री पटल्यावर डाॅ. हर्षवर्धन ठाकूर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात या फसवणूक प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी संचालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव याप्रकरणाचा तपास करत आहेत.