डोंबिवली – आम्ही शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ आहोत. आपल्या मुलीला आम्ही शासकीय कोट्यातून एम. बी. बी. एस. या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन जणांनी डोंबिवली एमआयडीसीत राहणाऱ्या एका नागरिकाकडून १६ लाख ८० हजार रूपये उकळले. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून न देता त्या मुलीचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष फुकट घालविले आणि पैसे उकळून नागरिकाची फसवणूक केली आहे.

सन २०२१ ते २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या नागरिकाने तक्रार केली आहे.

तक्रारदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपल्या मुलीला एम. बी. बी. एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता. आपल्या परिचिताकडून काही जणांशी ओळख झाली. त्या परिचितांनी आम्ही शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ आहोत असा देखावा तक्रारदार नागरिकासमोर उभा केला. एकाने आपण केईएम रुग्णालयातील व्यवस्थापन समितीवर आहोत. एकाने आपण नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जबाबदार पदावर कार्यरत असल्याचे सांगितले. सुरुवातीला यामधील एकाने या प्रवेश प्रक्रियेसाठी ५० लाख रूपये लागतील असे तक्रारदाराला सांगितले. तडजोडीने ही रक्कम १५ लाख रूपये देण्याचे ठरले.शासकीय कोट्यातून आपली प्रवेश प्रक्रिया होणार आहे. आपले १५ लाख रूपये नंतर आपणास परत मिळतील, असा दिलासा देऊन तथाकथित उच्चपदस्थाने आपल्या बँक खात्याचा एक कोरा धनादेश तक्रारदाराला देऊन विश्वास संपादन केला. या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदाराने टप्प्याने १६ लाख ८० हजार रूपये संबंधितांनी दिलेल्या बँक खात्यावर पाठविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पैसे भरणा केल्यावर तक्रारदाराने आपल्या मुलीची प्रवेश प्रक्रिया कधी होईल म्हणून तगादा लावण्यास सुरूवात केली. आपल्या मुलीचा प्रवेश शासकीय महाविद्यालयात नक्की झाला आहे. तिचा प्रवेश उशिरा झाल्याने तिची परीक्षा होऊन तिची गुणपत्रिकासुध्दा तयार आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थाने तक्रारदाराला दिली. हे बोलणे ऐकून मुलीचे वडील आश्चर्यचकित झाले. त्यांनी अन्य दोघांना संपर्क केला. त्यांनी तुमची प्रवेश प्रक्रिया होणार नाही, आम्हाला विचारू नका, अशी उत्तरे देऊन नंतर संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर या प्रकरणातील प्रमुख इसमाला तक्रारदाराने संपर्क केला. त्यांनी आपण आपले पैसे परत करू असे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांंनीही संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. प्रवेशासाठी पैसे घेऊन ते परत न करता फसवणूक केल्याबद्दल, मुलीचे शैक्षणिक वर्ष फुकट घालविल्याबद्दल तक्रारदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात तीन व्यक्तिंविरुध्द तक्रार केली आहे.