डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्त्यावर सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत जुगार अड्डा सुरू असतो. याच रस्त्यावर छत्रपती शिवाजी उद्याना जवळील स्वच्छतागृहाच्या बाजुला काही तरूण गांजा सेवन करतात. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हे प्रकार सुरू असताना रामनगर पोलीस ठाण्याचे गस्तीवरील पोलीस जुगार अड्डा चालक, उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या दोन महिला नेहरू रस्त्यावर छत्रपती शिवाजी उद्यानाच्या बाजुला असलेल्या कोपऱ्यावर सकाळपासून जुगार अड्डा चालवितात. याच रस्त्यावर स्वच्छता गृहाच्या बाजुला काही इसम गांजा विक्री करत असल्याच्या तक्रारी आहेत. काही जण याठिकाणी गर्दुल्यांना पैसे देऊन गांजाचे झुरके ओढण्यास देत आहेत. नेहरू रस्त्यावर हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू असल्याच्या या भागातील रहिवासी, व्यापारी, पादचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.
कल्याण, डोंबिवली शहरे नशामुक्त, अंमली पदार्थ तस्करी मुक्त करण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. दररोज दोन ते तीन अंमली पदार्थांची तस्करी करणारे तस्कर पोलीस जाळ्यात अडकत आहेत. उघड्यावर गांजा सेवन करणाऱ्यांंवर कारवाई केली जात आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील नेहरू रस्त्यावरील जुगार अड्डा, या भागातील गांजा तस्करांवर, गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
नेहरू रस्त्यावर सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत नाका कामगारांची गर्दी असते. महिला, पुरूष याठिकाणी रोजगारासाठी येतात. याठिकाणचे काही मजूर झटपट पैसे मिळतील या आशेने नेहरू रस्त्यावरील जुगार अड्डयावर जवळील मजुरीचे पैसे लावून खेळतात. काही रिक्षा चालक, टवाळखोर या अड्ड्यावर खेळण्यासाठी हजर असतात. काही जण याच भागातील स्वच्छतागृहाचा आडोसा घेऊन गांजा सेवन करतात. काही गांजाचे अतिसेवन केल्याने या भागात चिखलात, रस्त्याच्या कोपऱ्याला, पदपथावर पडलेले असतात. असे नेहमीचे या भागातील दृश्य आहे.
नेहरू रस्त्यावरील या गैरप्रकारांची स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली जाते. पण त्याची दखल घेतली जात नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. छत्रपती शिवाजी उद्यानात पालक, ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडांना घेऊन फिरण्यासाठी येतात. नेहरू रस्ता बाजारपेठेचा रस्ता आहे. या रस्त्यावर गांजा सेवन, जुगार अड्डे दिवसाढवळ्या सुरू राहत असल्याने वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी या भागातील रहिवासी करत आहेत.