डोंबिवली – एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात देशाच्या विविध भागातील पर्यटकांसह डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा केल्या शिवाय केंद्र शासन स्वस्थ बसणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. दहशतवाद्यांच्या बिमोड करणाऱ्या महोदव मोहिमेच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांचा सोमवारी लष्कराकडून खात्मा करण्यात आला.

पहलगाम हल्ल्यातील पर्यंटकांना धर्म विचारून त्यांच्यावर अमानुष गोळीबार करून त्यांचा जीव घेणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मंगळवारी लष्कराने गोळ्या घालून ठार केले. केंद्र सरकारची भूमिका आणि लष्कराने केलेल्या कारवाईवर बोलताना डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या संजय लेले यांचा सुपुत्र हर्षल लेले यांनी माध्यमांना सांगितले, की रविवारी माझ्या बाबांचा वाढदिवस होता. त्यांच्या आठवणी आम्ही जागवल्या. पण बाबांच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यानी माझ्या बाबांसह माझे दोन काका आणि इतर पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला.

त्या दहशतवाद्यांचा लष्कराने सोमवारी खात्मा केला आहे. हे ऐकून खूप समाधान वाटले. माझ्या बाबांना वाढदिवसाची मिळालेली ही भेट समजतो. त्याच बरोबर या हल्ल्यात मरण पावलेल्या इतर पर्यटकांच्या नातेवाईकांचा आत्मा नक्कीच आता समाधान पावला असेल. या भ्याड कृत्याला असेच चोख उत्तर देणे गरजेचे होते.

पहलागम हल्ल्यानंतर सरकारने दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत घटना घडून गेल्यानंतर काही दिवस दहशतवाद्यांविरुध्द, त्यांच्यावरील कारवाई विषयीसाठी बोलले जात होते. आता तसे होत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर देशाचे नेतृत्व पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत सांगत होते. त्याप्रमाणे लष्कराच्या विविध पोलिस यंत्रणांच्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहिमा सुरू होत्या. या मोहिमेच्या अंतर्गत महादेव मोहीम राबवून तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे ऐकून समाधान वाटले, असे हर्षल यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवाद्यांचे पूर्ण निर्दालन होत नाही तोपर्यंत अशा मोहिमा केंद्र शासनाने सुरूच ठेवल्या पाहिजे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भूभाग आहे. प्रत्येक भारतीयाला भारताने तो भूभाग पुन्हा घ्यावा, असेच वाटते. हा भाग ताब्यात घेण्यापूर्वी लष्कराने पहिले पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करावेत. म्हणजे त्यांना दहशतवादी कृत्य केल्यानंतर लपून बसण्यास जागा मिळणार नाही. आता कृत्य केल्यानंतर त्यांना लपून बसण्यास जागा आहेत. त्यांचे हे तळ उध्वस्त करण्याची मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्याची गरज आहे, असे हर्षल यांनी सांगितले.