डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील शतकोत्तर महोत्सव साजरा केलेल्या श्री गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भाविकांची दर्शनासाठी वाढती गर्दी विचारात घेऊन मंदिरात प्रत्येक भाविकाला श्रध्देने दर्शन घेता यावे असे विशेष नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती येथील श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा व प्रवचनकार अलका मुतालिक यांनी दिली.

श्री गणेश मंदिरात नियमित भाविकांची गर्दी असते. मंगळवारी या संख्येत वाढ असते. संकष्टी चुतर्थीच्या दिवशी मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी असते. डोंबिवली शहर परिसरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मंगळवारी (ता.१२) अंगारकी चतुर्थी आहे. वीस ते पंचविस हजाराहून अधिक नागरिक याठिकाणी दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारापासून दुतर्फा आणि गणपती मूर्तीसमोरील सभा मंडपात दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरती झाल्यानंतर गणपतीवर अभिषेक आणि त्यानंतर यथासांग पूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असणार आहेत. भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनातील कर्मचारी, याशिवाय डोंबिवलीतील विविध शाळांमधील एनसीसीचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून येथे गटा गटाने सेवा देतात. भाविकांना पाणी, प्रसाद, आरोग्य व्यवस्थेची सोय मंदिर प्रशासनाने केली आहे, असे अध्यक्षा अलका मुतालिक यांनी सांगितले. मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये असेही नियोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी वाहने घेऊन येणाऱ्या वाहन चालकांनी मंदिरापासून दूर अंतरावर वाहने उभी करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पहाटे पाच वाजल्यापासून मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सुरू होतील. त्यानंतर दुपारची आरती, रात्रीची चंद्रोदय पूर्वीची आरती होईल. पाऊस असल्यास या कालावधीत दर्शन रांगेत असलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये असेही नियोजन मंदिर प्रशासनाने केले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून रांगेतून प्रत्येक भाविकाला सोडण्यात येणार आहे. कोणीही भाविक दर्शन रांगेत मध्येच घुसणार नाही याची काटेकोर काळजी घेतली जाणार आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारातून भाविकांना दर्शन रांगेतून प्रवेश दिला जाणार आहे. दर्शनानंतर मंदिरातील इतर देवांचे दर्शन घेऊन भाविक प्रसाद घेऊन मंदिरा बाहेर पडतील, असे नियोजन करण्यात आले आहे. रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांची गर्दी पाहून ही वेळ वाढविण्याचे नियोजन आहे, असे अध्यक्षा मुतालिक यांनी सांगितले.