डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील दिवा बाजूकडील दिशेने लोकलच्या महिला डब्याजवळील फलाटाच्या फरशा उखडल्या आहेत. या उखडलेल्या फरशांच्या भागातून लोकलमध्ये चढ, उतर, जाताना महिलांना कसरत करावी लागते. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढउतर करताना महिला प्रवासी या तुटलेल्या फरशांच्या भागात पाय घसरून पडतात, अशा तक्रारी महिला प्रवाशांनी केल्या.
महिलांंच्या सुरक्षेसाठी फलाटावर, लोकल डब्यात विशेष सुविधा देणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मागील काही दिवसांपासून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर दिवा बाजूने तुटलेल्या फरशा दिसत नाहीत का. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस या भागात गस्त घालत असतात, असे प्रवाशांनी सांगितले.
अनेक महिला प्रवाशांनी स्थानिक रेल्वे व्यवस्थापकांकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. पण तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही, असे प्रवाशांनी सांगितले. आता फरशा तुटलेल्या भागात कोरडी सीमेंट मिश्रित वाळू, त्यावर फरशा आणून टाकल्या आहेत. आता मोकळ्या असलेल्या फरशीवर पाय घसरून महिला लोकलमध्ये चढताना पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मोकळ्या असलेल्या फरशीवर पाय पडला की फरशी हलते. त्यामुळे तोल जाऊन बेसावध असलेली महिला पडते. पाऊस सुरू असेल तर अनेक वेळा छत्री घेऊन या भागातून लोकलमध्ये चढणे मुश्किलीचे होते, असे महिला प्रवाशांनी सांगितले.
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकाच्या दरम्यान पादचारी पूल उभारणीचे काम सुरू आहे. सरकत्या जिन्यांचे काम सुरू आहे. या कामासाठी अनेक कामगार याठिकाणी काम करत आहेत. अशा परिस्थितीत या कामाच्या ठिकाणच्या मजुरांच्या साहाय्याने फलाट क्रमांक पाचवरील तुटलेल्या फरशांचा भाग सुस्थितीत करण्याचे काम स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांनी करावे. फरशा तुटलेल्या भागात लोकलचा महिला डबा येतो. त्यामुळे एखाद्या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत होईल तेव्हाच रेल्वे प्रशासन जागे होईल का, असे प्रश्न महिला प्रवासी करत आहेत.
अनेक महिला प्रवाशांनी यासंदर्भात उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. अरगडे यांनी रेल्वेच्या स्थानिक, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संवाद साधून फलाट क्रमांक पाचवरील महिला डब्याजवळील तुटलेल्या फरशांचा भाग लवकर सुस्थितीत करण्याची मागणी केली आहे. रेल्वे स्थानकाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू झाला की फलाटावर गळती सुरू होते. ही गळती बंद करण्याची प्रवाशांची मागणी आहे.