कल्याण – डोंबिवलीतील एक शिक्षिका आणि कल्याणमध्ये राहत असलेला एक इसम काही दिवस कल्याणमध्ये एकत्र राहत होते. या कालावधीत या इसमाने व्यवसाय सुरू करण्यासाठी शिक्षिकेकडून पाच लाख ६२ हजार रूपयांची रक्कम घेऊन ती रक्कम परत न करता शिक्षिकेची फसवणूक केली. तसेच, या शिक्षिकेच्या घरातील सोन्याचा ऐवज चोरला. हा इसम आपल्यापासून वेगळा राहण्यास लागल्यापासून आपणास मोबाईलवर अश्लिल संदेश पाठवून आपला मानसिक छळ करत आहे. आपणास आपले नाव पुढे करून आत्महत्या करण्याची धमकी देत आहे, अशी तक्रार डोंबिवली परिसरात राहत असलेल्या एका ४१ वर्षाच्या शिक्षिकेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात शुक्रवारी केली आहे.
डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत कल्याण पश्चिमेत खडकपाडा भागात हा चोरी, आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडला आहे. या इसमाकडून शिक्षिकेला अश्लिल लघुसंदेश पाठवून त्रास दिला जात असल्याने आणि या शिक्षिकेच्या नावाने मोबाईलवर स्टेटस ठेऊन आपण आता आत्महत्या करत आहोत, अशा धमक्या देत असल्याने त्रस्त शिक्षिकेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात सदर इसमा विरुध्द तक्रार केली आहे. ४३ वर्षाचा हा इसम कल्याण पश्चिमेत खडकपाडा भागात राहतो.
शिक्षिकेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत आपल्या ओळखीच्या इसमास सुरक्षा एजन्सी सुरू करायची होती. या कामासाठी त्याने आपल्याकडून पाच लाख ६२ हजार रूपये उसने घेतले. ही रक्कम परत करावी म्हणून शिक्षिकेने तगादा लावूनही इसमाने ती रक्कम आतापर्यंत परत न करता आपली फसवणूक केली आहे.
तसेच, सदर इसमा सोबत कल्याण येथे आपण राहत होतो. त्यावेळी इसमाने आपला कपाटातील सोन्याचा चार तोळ्याचा कंठीहार कपाटातून काढून घेऊन सोनाराकडे तारण ठेऊन त्या रकमेचा अपहार केला. शिक्षिकेने पैसे, सोन्याचा ऐवज परत मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली.
या सगळ्या प्रकाराने शिक्षिका या इसमापासून वेगळी राहू लागली. त्या गोष्टीचा राग येऊन इसमाने सदर शिक्षिकेला गेल्या दहा दिवसाच्या कालावधीत त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्यावर अश्लिल लघुसंदेश पाठवून तिला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तसेच, शिक्षिकेच्या समाज माध्यमांंतील समर्थकांना समाज माध्यमातून पाठलाग करून त्यांना त्रस्त केले. सदर इसमाने इन्सटाग्रामच्या वेळेच्याबंधन ठिकाणी ‘मी आत्महत्या करत आहे तुझ्यामुळे’ असा संदेश ठेऊन शिक्षिकेला धमकावण्याचा प्रयत्न केला. या इसमाचा सततचा त्रास वाढू लागल्याने अखेर त्रस्त झालेल्या शिक्षिकेने कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.