डोंबिवली – शुक्रवार, ५ सप्टेंबर शिक्षक (गुरूजी) दिन. राज्यभरातील सर्व स्तरातील गुरूजींचे. आजच्या आधुनिक भाषेत शिक्षकांचे सर्वदूर तोंडभरून कौतुक होईल. गणपती बाप्पा, तु मखरात असतानाच यावेळी शिक्षक दिन आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची घडण करणाऱ्या या शिक्षकांना मुलांना पूर्णवेळ शिकवण्यासाठी वेळ देता येईल यासाठी नियंत्रक प्रमुखांना सुबुध्दी दे. शिक्षकांवर लादण्यात आलेली भारंभार कामे कशी कमी होतील यासाठी नियंत्रक प्रमुखांच्या कानात दोन समजुतीच्या दोन गोष्टी तु सांग, असा नियंत्रकांना बोध घेण्यास लावणारा फलक येथील उपक्रमशील विद्यानिकेतन शाळेने आपल्या शाळेच्या बसवर लावला आहे.

मागील काही वर्षापासून राज्य, स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचे चित्रण, सामान्य माणसांच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न काही वर्षांपासून डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळा करत आहे. या माध्यमातून शहरातील नागरिक, विद्यार्थी, पालक यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शुक्रवार, ५ सप्टेंबर. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. या दिवशी राज्यभर शिक्षक दिन साजरा केला जातो. शिक्षकांचे सत्कार सोहळे, तोंडभरून कौतुक केले जाते. पण एकदा शिक्षकांच्या कौतुकाचा कार्यक्रम संपला की तोच शिक्षक पुन्हा मुलांना शाळेत शिकवायचे आहे असा फक्त विचार करून मतदानाच्या चिठ्या वाटप करायच्या आहेत. गावातील शेळ्या, मेंढया, शौचालये मौजायची आहेत. जनगणना, घराघरात आधारकार्ड आहेत की नाही याची तपासणी, महासाथ आली की औषध गोळ्या वाटप करायची आहेत. पेपर तपासणी, घोषित उपक्रम राबवायचे आहेत, या विचाराने विनम्रपणे आपल्या कामासाठी शाळेच्या आवारातून बाहेर पडतो.

या सर्व वेळखाऊ शिक्षणाशी दुरान्वये संबंध नसलेल्या कामातून मुक्तता करण्याचे काम गणराया तुच कर. न्यायालयाने आदेश देऊन झालेत. शिक्षक संघटनांनी पत्रे देऊन झाली आहेत. शिक्षक संघटनांची बांधिलकी आता राजकीय पक्षांशी आहे. कोणी कोणाचे ऐकण्यास तयार नाही. गणराया तु शाळाबाह्य कामातून तु गुरूजी लोकांची मुक्तता कर आणि त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, घडविण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल, असे काहीतर कर, अशी प्रार्थना या फलकाच्या माध्यमातून गणरायाला करण्यात आली आहे.

गुणवत्तादर्शक पीढी घडावी म्हणून प्रत्येकाची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेप्रमाणे शिक्षकांना वेतन मिळत आहे. शाळा बाह्य ओझे काही कमी होत नसल्याने गुरूजी मंडळी आदेश, हुकुमाचे बांधिल राहून पहिले आदेश आणि मग मुलांना शिकविण्याचे काम असा विचार करत आहेत. गुणवान पीढी घडविण्याची क्षमता असलेल्या शिक्षकाला गणराया तु शाळा बाह्य कामातून मुक्त कर. शाळेला समांतर आता जो खासगी शिकवण्यांचा अनिर्बंध व्यवसाय सुरू झाला आहे. त्याला कुठे आवर घालता येते का ते पाहा. शिक्षण प्रवाहातील चुकीचे पायंडे मोडून काढण्यासाठी गणराया तुच पुढाकार घे आणि सर्वसंंबंधितांना सुबुध्दी दे, असे फलकाच्या माध्यमातून म्हटले आहे.