डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत देसलेपाडा भागात राहत असलेल्या एका तरूणाला ऑनलाईन गेमचे व्यसन जडले होत. हे गेम खेळण्यासाठी त्याने विविध उपयोजनांच्या (ॲप) माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज वित्तीय संस्थांनी दिलेल्या वेळेत हा तरूण फेडू शकत नव्हता. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढून चिंताग्रस्त झाल्याने या तरूणाने राहत्या घरात गुरूवारी घातक रसायन पिऊन आत्महत्या केली.

मोहित त्रिवेंद्र पुन्दीर (३०) असे या तरूणाचे नाव आहे. या मृत्युप्रकरणाची मुंब्रा येथे राहणाऱ्या फैजान शेख या तरूणाने मानपाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. या माहितीप्रमाणे मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेतली आहे. गुरूवारी सकाळी मोहित पुन्दीर याने ॲल्युमिनिअम फाॅस्फाराईड हे घातक रसायन प्यायले असल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहिती अशी, की मोहित पुन्दीरला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. या गेमच्या पूर्ततेसाठी पैसे लागत होते. हे पैसे उभे करण्यासाठी मोहितने विविध उपयोजनांच्या माध्यमातून वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. अनेक संस्थांकडून घेतलेले कर्ज मोहित विहित वेळेत फेडू शकत नव्हता. देणेकरी संस्था मात्र मोहितच्या मागे कर्ज फेड करण्यासाठी तगादा लावून होता. आपण वेळेत कर्ज फेडू शकत नाहीत. एवढी रक्कम आपण उभी करायची कशी, असे अनेक प्रश्न मोहित पुन्दीरला सतावत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कर्जबाजारीपणामुळे मोहित चिंताग्रस्त झाला होता. गुरुवारी सकाळी देसलेपाडा येथील राहत्या घरात मोहित पुन्दीरने घातक रसायन प्राशन केले. त्याला तात्काळ उलट्या आणि इतर त्रास सुरू झाले. त्याला परिचितांनी एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी सकाळी साडे सहा वाजता दाखल केले. डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून मोहिमतला धोक्याच्या बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. अथक प्रयत्न करूनही शेवटी मोहितची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देईनाशी झाली. दुपारी मोहितने प्राण सोडले. मानपाडा पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेतली आहे. याप्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पाऊलबुध्दे करत आहेत.