डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा आदिवासी पाड्यांवर घरोघरी तिरंगा उपक्रम

आदिवासी नागरिक मोठ्या संख्येेने या संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

डोंबिवलीतील सामाजिक संस्थांचा आदिवासी पाड्यांवर घरोघरी तिरंगा उपक्रम
संग्रहित छायचित्र

डोंबिवलीतील शबरी सेवा समिती, इनरव्हिल क्लब डोंबिवली पू्र्व या आदिवासी भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांनी आदिवासी पाड्यांवर जाऊन हर घर तिरंगा उपक्रम राबविला. आदिवासी नागरिक, मुलांना घरोघरी तिरंगा उपक्रमाचे महत्व मार्गदर्शक कार्यक्रमातून सांगितले. आदिवासी नागरिक मोठ्या संख्येेने या संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

आदिवासी पाड्यावरील नागरिकांना घरावर लावण्यासाठी तिरंगा ध्वज उपलब्ध झाला पाहिजे यासाठी इनरव्हिल क्लब डोंबिवली पूर्व, शबरी सेवा समितीने डोंबिवली भागातून तिरंगा झेंडे, आदिवासी भागात राष्ट्रभक्ती संकल्पनेतून रांगोळी स्पर्धा घेण्यासाठी रांगोळ्या, रंग आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील नागरिकांना उपलब्ध करुन दिले.

डोंबिवली इनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा शोभा जावकर, सचिव कीर्ति जोशी, अश्विनी जडे, रेखा देशपांडे, नयना सुंठणकर, मीना गोडखिंडी, साद फाऊंडेशनचे कुलकर्णी आपल्या सदस्यांसह कर्जत जवळील वांगणी येथील बेडीस या आदिवासी पाड्यावर गेले. तेथे घरोघरी जाऊन तिरंग्याचे वाटप केले. पाड्यातील ग्रामस्थ, मुले, महिलांना एका प्रशस्त घरात एकत्र जमवून आपण घरोघरी तिरंगा हा उपक्रम का राबवित आहोत. याची माहिती दिली. देशभक्तीपर गिते यावेळी गाण्यात आली. आदिवासी नागरिकांनी या सुरात सूर मिसळला. खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
डोंबिवलीतील शबरी सेवा समितीतर्फे कर्जत, जव्हार, धुळे येथील आदिवासी पाड्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शाळकरी मुलांनी आपल्या संकल्पनेतून राष्ट्रभक्तीवर रांगोळ्या काढल्या. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. गावामध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. शबरी सेवा समितीचे प्रमोद करंदीकर, रंजना करंदीकर यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंब्य्रात गर्भवती तरुणीची प्रियकराकडून हत्या ; आरोपी अटकेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी