डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीने अस्वस्थता; बिल्डर आमदाराचे कारस्थान असल्याचा संशय
भिवंडीतील भूमाफियांसह भूमाफियांसह जिल्ह्य़ातील रेती माफियांपर्यत अनेकांच्या मुसक्या आवळत गेल्या वर्षभरापासून सातत्याने चर्चेत राहिलेल्या ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या बदलीमुळे भारतीय जनता पक्षातील काही आमदारांचा एक मोठा गट कमालीचा अस्वस्थ झाला आहे. माफिया आणि ठरावीक बिल्डरांचे आश्रयदाते असणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा संदेश या निमित्ताने जात असल्याचे म्हणणे या मंडळींनी वरिष्ठांकडे मांडले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. साधारण चार महिन्यांपूर्वी डॉ. जोशी यांच्या बदलीची हवा तयार होताच जिल्ह्य़ातील पक्षाच्या चार आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कार्यकाळ पूर्ण करून द्यावा, असे साकडे घातले होते. असे असताना नगरविकास विभागाने त्यांची उचलबांगडी केल्याने या बदलीवरून पक्षांत दोन गट पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करीत ‘पाटिलकी’ गाजवू पाहणाऱ्या जिल्ह्य़ातील एका नेत्याच्या कार्यपद्धतीमुळे भाजपमधील जुन्या-जाणत्यांचा एक मोठा गट सुरुवातीपासून अस्वस्थ आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवनेत्यांना हाताशी धरीत शिवसेनेला घाम फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपतील एका बिल्डर आमदाराचे काही मोठे प्रकल्प भिवंडी तसेच आसपासच्या परिसरात येऊ घातले आहेत. डॉ.जोशी यांनी भिवंडीतील बेकायदा गोदामांना हात घातल्याने या भागातील भाजपचे काही नेते कमालीचे अस्वस्थ होते. या नेत्यांनी या बिल्डर आमदाराला हाताशी धरीत डॉ. जोशी यांच्या बदली करण्यात महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे बोलले जाते. यामुळे जनसामान्यांमध्ये सरकारच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहील्याची प्रतिक्रिया पक्षातील आमदारांचा एक मोठा गट व्यक्त करू लागला आहे.
अस्वस्थता टोकाला
साधारपणे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला डॉ.जोशी यांच्या बदलीची जोरदार हवा निर्माण झाली होती. मीरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयाच्या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थगिती दिल्याने नगरविकास विभागात नाराजीचा सूर होता. नेमकी हीच संधी साधत जोशी यांच्याविरोधातील मोहीम त्यांच्या विरोधकांनी तीव्र केली होती. त्यांच्या बदलीच्या चर्चेमुळे जनसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच पक्षातील आमदारांचा एक मोठा गट मुख्यमंत्र्यांना भेटला. ठाणे शहर मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी जोशी समर्थक आमदारांचे नेतृत्व केले आणि त्यांना कार्यकाळ पुर्ण करून द्यावा, असा आग्रह धरला. यानंतर जोशी यांच्या बदलीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मात्र, गुरुवारी रात्री ७२ अधिकाऱ्यांच्या बदलीचे निमित्त साधीत जोशी यांनाही ठाण्यातून निरोप देण्यात आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. कठोर आणि धडाडीच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साथ देतात, अशी वातावरण निर्मिती गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे स्थानिक पदाधिकारी करताना दिसत आहेत. असे असताना जोशी यांची तडकाफडकी बदली झाल्याने सुजाण नागरिकांचा एक मोठा वर्ग नाराज होण्याची भीती पक्षाचे काही आमदार व्यक्त करू लागले आहेत. ही नाराजी या आमदारांनी वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे बोलले जाते. ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीची सूत्रे भिवंडीत पाटिलकी गाजविणाऱ्यांकडे दिल्यास स्वतच्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे होणार आहे, असे या गटाचे म्हणणे आहे. जोशी यांच्या बदलीच्या निमित्ताने हा गट कमालीचा नाराज झाला आहे.
आमदार केळकर यांची गुपचिळी
यासंबंधी भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्याचे टाळले. काही महिन्यांपूर्वी जोशी यांची बदली होऊ नये यासाठी माझ्यासह पक्षाचे अन्य तीन आमदार मुख्यमंत्र्यांना भेटले होते. नेमकी आता ही बदली का झाली ते मला ठाऊक नाही, असे त्यांनी सांगितले. या मुद्दय़ावरून पक्षात दोन गट पडले आहेत हे म्हणणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
डोंबिवलीकरांची स्वाक्षरी मोहीम
डोंबिवली : डॉ. अश्विनी जोशी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने संतापलेल्या डोंबिवलीतील सजग नागरिकांनी शासनाच्या या निर्णयाविरोधात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. ठाणे जिल्ह्य़ाच्या खाडीकिनारा भागात वाळूमाफियांनी घातलेला धुडगूस डॉ. जोशी यांनी काही प्रमाणात थांबविला होता. तसेच वाळूमाफियांना पाठीशी घालणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना त्यांनी घरचा रस्ता दाखविला होता. अशा अधिकाऱ्यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
डोंबिवलीतील जागृत भारत सेवाभावी संस्थेने शनिवार, रविवार रेल्वे स्थानकाजवळ राबविलेल्या या मोहिमेला हजारो रहिवाशांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. अनेक वर्षांत प्रथमच तडफदारपणे कामगिरी करणारा जिल्हाधिकारी ठाणे जिल्ह्य़ाला मिळाला होत्या. त्यामुळे त्यांना वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेली बेकायदा बांधकामे, उत्खनन, वाळूउपसा, भिवंडीजवळीची बेकायदा गोदामे यांचा बारकाईने अभ्यास करून जिल्हाधिकारी डॉ. जोशी यांनी या बेकायदा कामांविरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे अनेक राजकीय मंडळींसह माफिया दुखावले होते. गेल्या काही महिन्यांपासून जोशी यांच्या बदलीसाठी काही गावपाटील प्रयत्नशील होते; परंतु जनमताचा रेटा जोशी यांच्या बाजूने असल्याने शासनाकडून त्यांची बदली होत नव्हती. अखेर नागरिकांचा रोष नको म्हणून नियमित बदली प्रक्रिया राबविताना जोशी यांनाही ठाण्यातून हटविण्यात आले. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे.