डॉ. शशिकांत बामणे, संमोहनतज्ज्ञ, समुपदेशक, सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र स्टेज कलाकार
गेली कित्येक वर्षे संमोहनशास्त्रात कार्यरत असणारे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र सदस्य असणारे आणि स्टेज कलाकार असणारे डॉ. शशिकांत बामणे हे आज वसईत संमोहनतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत.
वाचनाची आवड मला लहानपणापासून आहे. इयत्ता तिसरीमध्ये असल्यापासून आजोबा मला पुस्तके वाचायला लावायचे. त्यांच्या दुकानात आलेल्या ग्राहकांसमोर माझा हुशार नातू म्हणून ओळख करून द्यायचे आणि माझ्याकडून बी ए, एम एची पुस्तके वाचून घ्यायचे. ते पुस्तक वाचून दाखवायचे मला चार आणे द्यायचे. ते पैसे मी जमवायचो. त्यातून मी पुस्तके विकत घेऊन वाचायचो. गावात पुस्तके मिळत नसल्याने मी जत्रेतून पुस्तके घ्यायचो. असेच एका जत्रेत पुस्तक विकत घ्यायला गेलो असता तिकडे जादूगाराचे पुस्तक हाती लागले. ते पुस्तक वाचून मी जादूगार व्हायचे ठरवले. तेव्हापासून पुस्तकांबरोबर वर्तमानपत्रे वाचण्याची आवडदेखील तितकीच होती. त्यातील बातम्या मुख्यत: साहित्यावरील लेख हे मी आवर्जून वाचायचो.
आतापर्यंत मी अनेक पुस्तके वाचली आहेत त्यातील ययाति, मनाचा गाभारा, विचार नियम, ज्ञानयोग, अंधार अंधश्रद्धेचा साक्षात्कार ही सर्वात आवडती पुस्तके. शिवखेरा, पु. ल. देशपांडे, स्वामी विवेकानंद, विश्वास पाटील हे आवडते लेखक आहेत. मनाचा वेध घेणारा कोणताही विषय मला वाचनात आवडतो. सामाजिक, न्यायिक, शारीरिक व यौगिक, आध्यात्मिक पुस्तके माझ्या वाचनात आली आहेत. या पुस्तकांचा माझ्या जीवनावर मोठय़ा प्रमाणावर प्रभाव टाकला आहे. पुस्तक म्हणजे माझ्यासाठी अंतर्मनाला जागृत करण्यासाठी एक प्रेरणामयच. छावा, मन, ऐतिहसिक, सामाजिक, अरोग्य या विषयांवरील सर्वच पुस्तकांचा संग्रह माझ्या कपाटात आहे. सुखाचा शोध बोध, तू आणि मी, मायाजाल, सुखी जीवनाचे पंचशील, जिनविद्या का?
मार्गदर्शन यासारखी अनेक पुस्तके मी वाचली असून माझ्या संग्रहात आहेत. प्रवासात, फावल्या वेळेत आणि दिवसातून किमान एक तास मी पुस्तक वाचण्याला देतो. वाचनाने मला घडवलं, मी समृद्ध झालो, माझा शब्दसंग्रह वाढला. आज त्याचा फायदा माझ्या जीवनात मला सर्वात जास्त होतो.