कल्याण : आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांनी आपल्यावर अंबरनाथ येथे आपल्या बोलण्यावरून टीका केली असली तरी, तो त्यांचा दोष नाही. ज्या पक्षाचा बॉस नकला करणारा असतो, त्याप्रमाणे त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्तेही नकलाच करणारे असतात. आता निवडणुकीनंतर दरेकर यांनाही नकला करतच फिरत राहावे लागणार आहे, अशी टीका कल्याण लोकसभेचे खासदार आणि उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी केली.

कल्याण लोकसभेतील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार गुरुवारी अंबरनाथ येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना विकास कामांच्या विषयावरून, त्यांच्या राजकीय जीवनपटाविषयी नर्मविनोदी पध्दतीने टीका करत त्यांची नक्कल केली.

हेही वाचा…एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांनी लोकसभा लढविण्यास सांगितले होते, पण त्यांनी नकार दिला – खासदार राजन विचारे

खासदार शिंदे राजकारणात आले त्यावेळी त्यांना अ, ब, क पण येत नव्हते. या गोष्टी त्यांना शिवसेनेने शिकवल्या. त्यामधून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. अ, ब, क म्हणजे आपण जे काम करतो ते काम आपल्या मेंदुत घट्ट असले पाहिजेत. विकास कामे, सामाजिक कार्याचे विषय पक्के असले पाहिजेत. त्याविषयी आपणास भरपूर माहिती असली आणि ती कामे करण्याची आपणास उर्मी असली की कोणीही कधी याठिकाणी, त्या ठिकाणी, ओठ आवळून मग असे शब्द वापरत नाही, अशा टिकात्मक विनोदी शैलीने दरेकर यांनी खासदार शिंदे यांची नक्कल केली. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अंबरनाथमध्ये अनेक दिवसांनी आले असले तरी मला, माझ्या कार्यकर्त्याला अंबरनाथ शहरातील मुख्य समस्या काय आहे. येथल्या लोकांचे मार्गी लावण्यासारखे विषय कोणते, कोणते विषय कधी मार्गी लागतील याची माहिती असते. कारण दररोज या शहरात फिरतो, त्याला लोकांच्या प्रश्नांची जाण असते. त्याच्या डोक्यात असे लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे पक्के असते.

हेही वाचा…जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रिया सुळेंना राजकीय फायदा घ्यायचा असता तर…

याठिकाणी, त्या ठिकाणी करून असे विषय मार्गी लागत नसतात, ती धूळफेक असते, असे सांगून वैशाली दरेकर यांनी खासदार शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले होते. या टिकेला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले, अशा पध्दतीने आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या असतील तर त्यांना त्याच्या शुभेच्छा. असे दरेकर यांनी केले असेल तर ती त्यांची चूक नाही. ज्याप्रमाणे बॉस वागतो त्याप्रमाणे बिचाऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना वागावे लागते. त्याचीच री दरेकर ओढत आहेत. एकदा निवडणुका संपल्या की त्यांना नंतर मिमिक्री करण्याचे काम उरणार आहे, अशा शब्दात खा. शिंदे यांनी दरेकर यांचा समाचार घेतला.