बदलापूर: आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली नसली तरी यावर मोठ्या प्रमाणावर वादंग रंगले. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रभाग रचनेत घोटाळा झाला असून अनेक ठिकाणी फिक्सिंग झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार स्थानिक पातळीवर प्रशासनाची तयारी काही दिवसांआधीच सुरू झाली होती. त्यानुसार कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार केली होती. ती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. त्या वेळापत्रकानुसार सोमवार, १८ ऑगस्ट रोजी ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाते आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेत सकाळपासून ही रचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर संकेतस्थळावरही ही प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. नागरिकांना ती पाहता यावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मात्र ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच तिच्यावरून शहरात वादंग पाहायला मिळाले. मुळात ही प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी ती गोपनीय असते. मात्र त्यात फिक्सिंग झाल्याचा आरोप करत आमदार किसन कथोरे यांनी एकच खळबळ उडवून दिली होती.
नियम पायदळी तुडवून याची रचना करण्यात आली. यात आर्थिक देवाण घेवाण झाली. नदी, नैसर्गिक नाले, महत्त्वाचे रस्ते यांच्या सीमा ओलांडल्या गेल्या, असे अनेक आरोप यावेळी किसन कथोरे यांनी केले होते. १५ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधताना याचा पुनरूच्चार केला. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली होती.
प्रारूप प्रभाग रचना कशी फुटली
प्रसिद्ध होण्यापूर्वीच या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेतले गेल्याने ही फुटली कशी अशी चर्चा रंगली. त्यावर आक्षेप घेणारे आमदार किसन कथोरे यांनी ही फुटली कशी याची गोष्ट माध्यमांशी बोलताना सांगितली. ज्या लोकांनी आर्थिक देवाण घेवाण करत रचनेत फिक्सिंग केली त्यांनीच याची माहिती बाहेर कळवली. आम्ही सुरक्षित झालो आहोत अशी बाब त्यांनीच सांगितली. ते याचा प्रचार करत सुटले. त्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला याची माहिती मिळाली, असे वक्तव्य आमदार किसन कथोरे यांनी केले होते.