या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामाची मुदत संपूनही चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत उभारण्यात येत असलेल्या मलप्रक्रिया केंद्राची कामे विहित मुदतीत पूर्ण होत नसल्याने या दोन्ही शहरांतून दररोज निघणारे तब्बल १९४ दशलक्ष लिटर सांडपाणी विनाप्रक्रिया खाडीत सोडले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. उल्हास नदीतील पात्रात रसायनांसह सांडपाण्याचे प्रदूषण एकीकडे वाढत असताना कल्याण डोंबिवली महापालिका खाडीपात्रात शहरातील जवळपास ९० टक्क्यांहून अधिक सांडपाणी कोणत्याही प्रक्रियाविना सोडत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सहा महिन्यांपूर्वी कोकण विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मलउदंचन केंद्रांच्या कामाची प्रगती तपासण्यासंबंधी कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कल्याण डोंबिवली पालिकेने मे २०१७ पर्यंत कल्याणमधील आधारवाडी, बारावे, पूर्वेतील चिंचपाडा, टिटवाळा येथील मलप्रक्रिया केंद्र (सीवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट) सुरू होतील, असा दावा केला होता. या केंद्रांमधून ८० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल, असे महापालिकेमार्फत सांगण्यात येत आहे. याशिवाय डोंबिवलीतील मोठागाव येथील केंद्रातून ४० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया तसेच आधारवाडी प्रक्रिया केंद्राची क्षमता ३३ एमएलडीपर्यंत वाढवण्याचे आश्वासनही पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. मात्र मे महिना उलटून गेला तरी पालिकेने ही कामे पूर्ण केलेली नाहीत.

मलप्रक्रिया केंद्रांच्या प्रगतीविषयी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा, प्रक्रिया केंद्रांची उभारणी पूर्ण झाली आहे, आता केंद्र ते सोसायटय़ांच्या वाहिन्या एकत्र जोडण्याची कामे बाकी आहेत, असे ठोकळेबाज उत्तर मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांनी दिले.

मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत कोलते यांच्याशी दोन दिवस सतत संपर्क करूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपण बैठकीत व्यस्त असल्याचा संदेश ते पाठवीत होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी ‘पुढची आढावा बैठक विभागीय आयुक्तांकडे होईल. त्यावेळी पालिकेला त्याची माहिती द्यावी लागेल,’ असे सांगितले.

[jwplayer 1IvKQiSS-1o30kmL6]

२७ कोटी पाण्यात

प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी शासनाकडून आलेला २७ कोटींचा निधी पाण्यात गेला आहे. वाहिन्या जोडण्याची कामे निकृष्ट दर्जाची असल्याची टीका होत असून या कामासाठी वापरलेले पाइप निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. अनेक ठिकाणचे पंप खराब झाले आहेत, अशी टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी प्रशासनाला दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drainage issue in kdmc drainage
First published on: 14-07-2017 at 01:41 IST