ठाण्यातील नाटय़गृह सुरू झाल्याने रसिकांना दिलासा
डागडुजीसाठी गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह अखेर शनिवारपासून सुरू झाले. या नाटय़गृहात शनिवारी दुपारी ‘कोडमंत्र’ या नाटकाचा प्रयोग करण्यात आला, तसेच गणेशोत्सवातही या ठिकाणी नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, कल्याण येथील महापालिकेचे आचार्य अत्रे रंगमंदिर सुरू होण्यास नववर्षांचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे नाटय़गृह डागडुजीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. तीन महिन्यांत नाटय़गृह सुरू होईल असा महापालिकेने केलेला दावा फोल ठरला असून ऑक्टोबरची तारीखही टळण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका हद्दीतील लोकसंख्या दिवसागणित वाढत असल्याने नव्या ठाण्याचा विचार करत महापालिकेने हिरानंदानी समूहाच्या पुढाकाराने लोकपुरम भागात डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाची उभारणी केली आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी या नाटय़गृहाचे छत कोसळल्यामुळे खळबळ उडाली होती. हे काम संबंधित विकासकाने करून द्यावे, असा महापालिकेचा आग्रह होता. अखेर दीड वर्षांच्या लांबलेल्या कामानंतर गेल्या शनिवारी नाटय़गृह रसिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी आतापर्यंत दोन नाटकांचे प्रयोग झाले असून येत्या गणेशोत्सवातही नाटय़गृह सुरू राहील, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांनी दिली.
अत्रे रंगमंदिर नव्या वर्षांत
मागील वर्षभरापासून आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीची गरज व्यक्त केली जात होती. मात्र, हे काम लांबणीवर पडत होते. अखेर १ एप्रिलपासून हे काम सुरू झाले. या कामासाठी ३ महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती अगदीच बेताची असल्याने हे काम लांबणीवर पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ६५ लाख रुपयांची निविदा मागविण्यात आली होती. मात्र, त्यास ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ही निविदा मागविण्यात आली आहे. या दुरुस्तीसमवेतच नाटय़गृहात प्रशस्त तालीम खोलीदेखील सुरू करण्यात येणार आहे. नाटय़गृहाच्या तारखा मिळविण्यासाठी तीन महिने आधीच संस्थांना तसेच निर्मात्यांना अर्ज करावे लागतात. निविदा प्रक्रियेनंतर काम सुरू झाल्याने ऑक्टोबरमध्ये नाटय़गृह सुरू होणार असे सांगितल्यामुळे निर्मात्यांकडून तसेच संस्थेकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र आता हे अर्जही रद्द करावे लागणार असून जानेवारीपर्यंत नाटय़गृह उपलब्ध होऊ शकत नाही. नाटय़संस्थचे साधारण ४० अर्ज आणि सामाजिक संस्थेचे १० ते १२ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. तसेच कल्याण- डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली येथील फुले नाटय़ागृहात संस्थांनी प्रयत्न करावेत असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. कल्याण गायन समाज, राज्यनाटय़ स्पर्धा असे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असल्याने संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कल्याण गायन समाजाचे प्रशांत दांडेकर यांनी पालिकेतर्फे कोणतीही ठोस सूचना दिली नसल्याचे सांगितले.
अत्रे रंगमंदिराच्या डागडुजीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या नाटय़गृहाचे काम सुरू होणार आहे. मात्र, काम पूर्ण होऊन नाटय़गृह सुरू होण्यास जानेवारी महिना उजाडणार आहे.
– प्रसाद ठाकूर, जनसंपर्क अधिकारी, कडोंमपा