कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव

नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे महसुली उत्पन्न वाढवण्याचा निर्णय नव्या कार्यकारिणीने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून लवकरच कल्याणमध्ये सुकामेव्याची बाजारपेठ उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सुकामेवा बाजाराप्रमाणे कल्याण बाजार समितीच्या आवारातही अशा प्रकारची बाजारपेठ उभारण्याचा मनोदय बाजार समिती संचालकांनी व्यक्त केला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे आपली पक्षीय जहागिरी आणि आपल्या नेत्यांनी ती आपणास केवळ ‘हात’ मारण्यासाठी दिली आहे, अशा भावनेतून वर्षांनुवर्षे बाजार समितीचा कारभार चालला होता. वर्षांनुवर्षांची ही पारंपरिक प्रथा बाजार समितीचे नवोदित सभापती रवींद्र घोडविंदे यांनी मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीमधील उपक्रम, तेथील सुविधांचा सर्वाधिक लाभ अन्य भागातील शेतकरी, व्यापाऱ्यांबरोबर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, वाडा परिसरातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे हा विचार करून घोडविंदे यांनी बाजार समितीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे.

बाजार समितीमध्ये सुक्यामेव्याचे प्रशस्त दालन सुरू करून स्थानिक व्यावसायिकांना या ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे. ग्राहकांना दर्जेदार व रास्त किमतीमधील सुकामेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था या दालनात करण्यात येणार आहे. येत्या सर्वसाधारण सभेत सुकामेवा मार्केट सुरू करण्याचा प्रस्ताव घेऊन तो मंजूर करण्यात येणार आहे, असे सभापती घोडविंदे यांनी सांगितले. कल्याण, मुरबाड, शहापूर परिसरात अनेक कुटुंब, महिला बचतगट सुकामेवा निर्मिती करण्याच्या व्यवसायात आहेत. त्यांना या बाजारात उलाढाल करणे शक्य होणार आहे. बाहेरच्या प्रांतामधून, देशांमधून येणारा दर्जेदार सुकामेवा या दालनात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

बाजार समितीच्या दहा एकरच्या परीघ क्षेत्राला संरक्षक भिंत बांधण्याऐवजी परीघ क्षेत्रात व्यापारी गाळे बांधण्याचे प्रस्तावित आहे. या गाळ्यांमध्ये महिला बचत गटांना व अन्य व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ज्या ठिकाणी बाजारपेठ त्या ठिकाणी स्नानगृह, प्रसाधनगृह, भोजन, चहाची व्यवस्था अशी व्यवस्था प्रत्येक दालनात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाजार समितीला एक नवे रंगरूप व आकार देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे घोडविंदे यांनी सांगितले.

शीतगृहाची उभारणी

बाजार समितीत दररोज कोलकत्ता, जुन्नर, नाशिक, अहमदनगर भागातून फुले येतात. या फुलांसाठी फूल मार्केटच्या तिसऱ्या माळ्यावर शीतगृह उभारण्यात येणार आहे. फूल मार्केटच्या नवीन वास्तूची उभारणी समिती करत आहे. व्यापारी, शेतकऱ्यांचा विचार करून या बाजाराची उभारणी करण्यात येत आहे, असे रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.