अंबरनाथः अंबरनाथ पूर्वेकडील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या बी कॅबिन मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून, हा रस्ता नागरिकांसाठी अक्षरशः धोक्याचा ठरत आहे. महिन्याला सरासरी १५ पेक्षा जास्त अपघात या मार्गावर होत असल्याचे स्थानिक सांगतात. विशेषतः बेदरकार रिक्षाचालक आणि वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले वारंवार जखमी होत आहेत. तरीदेखील पोलिस व नगरपालिकेकडून कोणतीही ठोस पावले न उचलल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे.
अंबरनाथच्या वेशीवरील भागात मागील काही वर्षांत मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी वेगाने उभारी घेतली आहे. बी कॅबिन मार्गावरील मोरीवली पाडा, निसर्ग ग्रीन टाउनशिप परिसर हे त्याचे प्रमुख केंद्र ठरले आहेत. या भागात शाळा, मॉल, व्यापारी संकुले यामुळे हजारो नागरिक सकाळ-संध्याकाळ या मार्गावरून प्रवास करतात. अनेक महत्वाची दुकाने, नामांकीत कंपन्यांच्या शाखा, ऑनलाईन वस्तूंचे वितरण केंद्र या भागात आहेत. त्यामुळे नागरी वाहतुकीसह अवजड वाहतूकही या भागातून होत असते.
मात्र, प्रशस्त रस्ता असूनही रिक्षाचालक आणि काही वाहनचालक मोठ्या वेगाने, बेफिकिरीने वाहने चालवतात. गेल्या वर्षभरात अपघातांची संख्या झपाट्याने वाढली असून महिन्याला १५ पेक्षा जास्त अपघात होतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात शाळेत मुलांना सोडणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या भागात रस्ता ओलांडणेही जिकीरीचे बनले आहे.
संध्याकाळनंतर या मार्गावर अनेकदा मद्यधुंद रिक्षाचालक व वाहनचालक गाड्या चालवताना दिसतात. हे चालक अपघाताचे मुख्य कारण ठरत आहेत. मात्र यातील अनेक अपघातांची पोलिस ठाण्यात नोंद होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती किती गंभीर आहे याचा अधिकृत खुलासा होऊ शकत नाही. याच दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे बॅनर आणि राजकीय जाहिराती झळकताना दिसतात; पण नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याकडे मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून लक्ष दिले जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरीकांचा संतप्त सवाल
पोलिस आणि नगरपालिका दोन्हीही डोळेझाक करत असल्याने आमच्यावर अपघाताचे सावट कायम आहे. अपघात थांबणार तरी कधी, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. येत्या काळात या भागात वाहनांची संख्या आणखी वाढू शकते. अशावेळी बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होते आहे.
लवकरच दुभाजक
या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यांना जबाबदार धरले जाईल. बी कॅबिन मार्गावर दुभाजक उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून, अपघात रोखण्यासाठी आणि वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी लवकरच काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.