कल्याण – साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड परिसरातील वाहन मालकांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आणि दसऱ्याच्या दिवशी नवीन विविध प्रकारची ६०६ नवीन वाहने खरेदी करून उपप्रादेशिक परिवहन कल्याण कार्यालयात या वाहनांची नोंदणी केली, अशी माहिती कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिली.या वाहनांमध्ये आठ वाहने विद्युत शक्ती धावणारी आहेत. या वाहनांच्या खरेदीमुळे नागरिकांचा विद्युत वाहने खरेदीकडे ओढा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक हौशी नागरिक सण, उत्सवांच्या मुहुर्तावर वाहन खरेदीला प्राधान्य देतात. दसरा सण यामध्ये विशेष निवडला जातो. कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रातील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, उल्हासनगर, शहापूर परिसरातील नागरिकांनी बुधवारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आणि गुरूवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर विविध वाहन शोरूममधून विविध प्रकारची एकूण ६१४ वाहने खरेदी केली. यामध्ये ६०६ वाहने पेट्रोल, डिझेल, सीएनजीवर धावणारी तर आठ वाहने ही विद्युत शक्तीवर धावणारी आहेत.
दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिक हौशीने वाहने खरेदी करतात. त्यांना तात्काळ वाहन नोंदणी करून दिली तर सणासुदीत ते आपले वाहन घेऊन फिरू शकतात. यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गुरूवारी शासकीय सुट्टी असुनही सुरू ठेवले होते. वाहन नोंदणीसाठी आलेल्या नवीन वाहन खरेदीदारांच्या वाहनांच्या तात्काळ नोंदणी करून त्यांना वाहनांची आवश्यक कागदपत्रे देण्यात आली. या माध्यमातून परिवहन विभागाला महसूल मिळतो, असे बारकुल यांनी सांगितले.गेल्या दोन दिवसात वाहन मालकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ३९१ दुचाकी, १७० मोटार कार, १५ पर्यटन कार, मालवाहू वाहने १९, नऊ रिक्षा, इतर दोन वाहने अशी वाहने खरेदी केली.
गेल्या वर्षभरात ऑक्टोबर २०२४ मध्ये दोन हजार ७१० दुचाकी, ६०१ मोटार, ८७ पर्यटन कार, १२१ मालवाहू वाहने, ७८ रिक्षा, पाच रुग्णवाहिका, पाच बस, इतर नऊ वाहने अशा एकूण तीन हजार ६१७ वाहनांची नोंदणी कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. २२ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दोन हजार ७७१ दुचाकी, एक हजार ४२ मोटार कार, १०९ पर्यटन कार, ७६ मालवाहू वाहने, पाच बस, ७० रिक्षा, इतर सात वाहने यांची आरटीओ कल्याण कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांनी दिली.
दसरा सणाचा मुहूर्त साधून अनेक नागरिक वाहन खरेदीला प्राधान्य देतात. अशा वाहनांची तात्काळ वाहन नोंदणी करून त्यांना वाहनांचे आवश्यक कागदपत्रे त्याच दिवशी मिळावीत म्हणून कल्याण आरटीओ कार्यालय गुरूवारी दिवसभर खुले ठेवण्यात आले होते. वाहन नोंदणीसाठी आलेल्या सर्व वाहन मालकांची वाहन नोंदणी करून देण्यात आली.- आशुतोष बारकुल,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी. कल्याण.