२०१९ मध्ये विधानसभेचे निकाल लागल्यानंतर ५०-५० सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा निर्माण झाला आणि त्यामधूनच महाविकास आघाडीचा जन्म झाला. एक शिवसैनिकच मुख्यमंत्री होईल असं वचन आपण बाळासाहेब ठाकरेंना दिल्याचे वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वीच्या एका भाषणात केले होते. त्यामुळे सेनेकडून युवासेनाप्रमुख आणि वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. आदित्य यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करणारे अनेक बॅनर्स वरळीमध्ये दिसून आले होते. मात्र अखेर आदित्य यांचे वडील आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेदरम्यान ठाण्यातही शिवसेनेच्या एका आमदाराचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर्स लागलेले. याच आमदाराचे पोस्टर्स आता जवळजवळ अडीच वर्षानंतर याच मथळ्याखाली झळकल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्याचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी त्यांचे पोस्टर्स लागले आहेत. ९ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. ठाण्यामध्ये शिंदेचं राजकीय वर्चस्व असणाऱ्या पाचपाखाडी कोपरी मतदारसंघाबरोबरच शहरभर अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेत. मात्र वागळे इस्टेटमध्ये लावण्यात आलेल्या काही बॅनरवर एकनाथ शिंदेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आलाय.

वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र तसेच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे याचे फोटो आणि नावाचा उल्लेख आहे. श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस ४ फेब्रुवारीला असतो तर एकनाथ शिंदेंचा वाढदिवस बुधवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी आहे. त्याचनिमित्त लावलेल्या या बॅनरवर ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आल्याने हे पोस्टर ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरतंय. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे बॅनर लावल्याचं फोटोवरुन स्पष्ट होतंय.

यापूर्वी २०१९ मध्ये शहरातील कोलबाड परिसरामध्ये मराठी वाहतूक व्यापारी सेना संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशा मागणीचे बॅनर्स लावले होते. ‘आमच्या ठाण्याचे लाडके ढाण्यावाघ एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवोत हिच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना’ असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला होता.

बॅनरचं टायमिंग आणि चर्चा…
२०१९ मध्ये मुंबई शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांच्या बैठकीमध्ये शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर हे पोस्टर ठाण्यामध्ये झळकल्याने राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना तोंड फुटले होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत जाण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दर्शवली आणि ते मुख्यमंत्री असतील तरच महाविकास आघाडीची मोट बांधली जाईल अशी अट ठेवल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर असेच झाले आणि २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या रुपाने मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे गेलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरत्या कार्यभारावरुन चर्चेत…
काही आठवड्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणांमुळे हिवाळी अधिवेशनात तसेच दैनंदिन कारभारामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहत नसल्याने मुख्यमंत्री पदाचा कारभार तात्पुरत्या स्वरुपात एकनाथ शिंदेंकडे सोपवण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या. त्यावेळीही शिंदेंनी स्पष्टीकरण देत, “मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या खोडसाळ मेसेज आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही विनंती,” असं म्हटलं होतं.