Eknath shinde : निवडणूका जवळ आल्यानंतर मुंबई तोडणार अशी आवई केली जाते. हे आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडले आहे. परंतु कोणाच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी कोणाचा बाप मुंबईपासून महाराष्ट्र तोडू शकत नाही. अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुंबईतून बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आम्हाला आणायचे आमचे स्वप्न असल्याचेही ते म्हणाले.
मुंबईतील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंदाश्रमात पक्ष प्रवेश पार पडला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. मी मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मुंबई खड्डे मुक्त करण्याचा संकल्प केला. मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे केले जात आहेत. मुंबईच्या सुशोभिकरणाची कामे केली. आम्ही अनेक निर्णय घेतले. त्यामुळे काही जणांची दुकाने बंद झाली. काहीजण दरवर्षी रस्त्यांची दुरुस्ती करत होते. आता काँक्रीटचे रस्ते झाल्यामुळे २० -२५ वर्ष रस्त्यांना काही होणार नाही असे शिंदे म्हणाले.
निवडणूका आल्यावर मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही. निवडणूका जवळ आल्यानंतर मुंबई तोडणार अशी आवई होते. हे आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडले आहे. परंतु कोणाच्या सात पिढ्या जरी खाली आल्या तरी कोणाचा बाप मुंबईपासून महाराष्ट्र तोडू शकत नाही. मुंबई आर्थिक राजधानी आहे. मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी काहीजण समजत होते. परंतु निवडणूकांमध्ये जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
आम्ही जनतेसाठी कामे केली. आम्ही आरोपांना आरोपांनी नाही तर कामाने उत्तर देतो. विधानसभा निवडणूकीत आम्ही ८० जागा लढलो. त्यापैकी ६० जागा जिंकले. पण ते १०० लढून २० जागा जिंकले. जे काम करतात. त्यांना लोकांनी आशिर्वाद दिला. पण जे घरी बसतात. त्यांना घरी बसविले असेही ते म्हणाले.
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पूनर्विकासाच्या माध्मातून पुन्हा मुंबईत आणणार
– मुंबईला वैभव प्राप्त करुन द्यायचे आहे. मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्याला कोण कारणीभूत आहे , याचा विचार करणे आवश्यक आहे. मुंबईतून बाहेर फेकले गेलेल्यांना पूनर्विकासाच्या माध्यमातून पुन्हा मुंबईत आणायचे आमचे स्वप्न असल्याचा दावाही त्यांनी केला.
महायुतीत निवडणूका लढणार
– शिवसेनेत माजी नगरसेवकांंची संख्या १२४ झाली आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणूका लढविणार आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका महायुती जिंकली. त्याप्रमाणे, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका देखील महायुती जिंकणार असा दावा शिंदे यांनी केला. महायुतीकडून विकासाचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश होत असल्याचेही त्यांनी सांगितले.