ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा आणि मुंब्रा परिसराच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी ५५ कोटी रुपयांचा विशेष निधी आणून ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येथे निधीची पेरणी सुरू केल्याचे चित्र आहे. हा निधी मिळाल्याने राष्ट्रवादी, एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यानिमित्ताने शिवसेनेचे ‘कळवा-मुंब्रा’ मिशन पुन्हा सुरू झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कळवा-मुंब्रा परिसराचे प्रतिनिधीत्व करतात. या भागातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक ठाणे महापालिकेत निवडूण जातात. हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्राकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये कळवा-मुंब्रा हा परिसर येतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात मैत्रीपुर्ण संबंध होते आणि या दोन्ही नेत्यांनी भाषणामधून मैत्रीचे दाखलेही दिले होते. परंतु राज्यातील सत्ताबदलानंतर ठाण्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार आव्हाड यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील खड्डे, कचऱ्यावरुन नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

आमदार आव्हाड आणि खासदार शिंदे यांच्यात विळा-भोपळ्याचे नाते आहे. यामुळेच राज्यातील सत्ताबदलानंतर खासदार शिंदे यांनी कळवा-मुंब्रा भागावर लक्ष केंद्रीत करून तेथील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना गळा लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कळव्यातील नगरसेवक जितेंद्र पाटील यांच्या इतर पदाधिकाऱ्यांना पक्ष प्रवेश देऊन त्यांनी आव्हाड यांना धक्काही दिला होता. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजण किणे यांच्या नेतृत्वाखाली मुंब्य्रातील काही नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सूरू आहे. असे असतानाच, कळवा आणि मुंब्रा परिसराच्या विकासासाठी खासदार शिंदे यांनी ५५ कोटी रुपयांचा विशेष निधी आणला. हा निधी मिळवून दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजन किणे, अनिता किणे, मोरेश्वर किणे, साजिया अन्सारी यांचे दिर राजू अन्सारी, एमआयएमचे माजी नगरसेवक आजमी शाह आलम शाहिद यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

हेही वाचा >>> राज्यातील ‘आरटीओ’ कार्यालयांमध्ये स्मार्ट कार्डचा तुटवडा? वाहन मालक, चालकांच्या कार्यालयात चकरा

कळवा आणि मुंब्रा परिसरातील माजी नगरसेवकांना कोणी विचारत घेत नाही आणि बाहेरची लोक येथे येऊन लुडबुड करतात. अशा भावना तेथील माजी नगरसेवकांनी व्यक्त केल्या होत्या. तसेच प्रभागातील विकासकामांसाठी निधी मिळावा, अशीही त्यांनी केली होती. या दोन्ही परिसरांच्या विकासासाठी ५५ कोटींचा विशेष निधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंजुर करून घेतला आहे. यामुळे तेथील नगरसेवकांनी पक्षीय बंध झुगारून खासदार शिंदे यांचे आभार मानत सत्कार केला.

-नरेश म्हस्के, राज्य समन्वयक, शिवसेना

एमएमआरडीए निधी राजकीय पद्धतीने वापरला जातोय. विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदार संघात हा निधी दिला जात आहे. पण, त्यातून नागरिकांची कामे होणार असतील तर ही चांगली बाब आहे. गेली ९ वर्षे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांना कळवा-मुंब्रा परिसराच्या विकासाची आता आठवण झाली, हे दुदैव आहे.

-आनंद परांजपे, ठाणे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस