Thane News, ठाणे – सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय सर्वांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला आहे. अपघात झालेल्या जखमी बाईकस्वाराला एकनाथ शिंदे यांनी ताफा थांबवत मदत केली. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात बुधवारी गणपतीचे घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात आगमन झाले. ठाणे शहरातील वागळे इस्टेट भागातील किसन नगर परिसरात असलेल्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीची प्राणप्रतिष्ठा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होती. त्यासाठी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किसनगरमधील या मंडळात आले होते. घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना भेट देऊन दर्शन घेण्याची परंपरा दिवंगत आनंद दिघे यांची होती. दिघे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.

किसननगर येथील मंडळात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे हे घरगुती दीड दिवसांच्या गणपतीच्या दर्शनासाठी ठाणे शहरात फिरत होते. त्यांचा ताफा संध्याकाळी घोडबंदर रोडवर आला असता, त्यांना एका बाईकस्वाराचा अपघात झाल्याचे दिसून आले. तो बाईकस्वार रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत बसलेला दिसला. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही त्यांनी तत्काळ त्यांचा ताफा थांबवला. उपमुख्यमंत्री शिंदे गाडीतून उतरले आणि अपघातग्रस्त तरुणाची विचारपूस केली. त्यावेळी या तरुणाने आपली दुचाकी घसरल्याने आपल्या खांद्याला दुखापत झाल्याचे त्यांना सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका पुढे घेतली. या तरुणाला त्या रुग्णवाहिकेत बसवून घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच त्यांच्या ताफ्यातील एका अधिकाऱ्यास त्या तरुणाची देखरेख करण्यासाठी तेथे थांबण्यास सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या मदतीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

गणेशोत्सवाच्या काळात जखमी तरुणाच्या मदतीला धावून जात उपमुख्यमंत्री शिंदे हे देखील या तरुणासाठी खरे विघ्नहर्ता ठरले असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. याआधी देखील शिंदे यांनी ताफा थांबवून एका व्यक्तीला मदत केली होती. त्यामुळे शिंदे यांच्या संवेदनशील आणि तत्पर स्वभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.