Eknath Shinde on Anand Dighe : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालयाची निर्मीती केली होती. हे देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय ठरले होते. या मंत्रालय निर्मीती मागचे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना सांगितले आणि त्यामागे शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची प्रेरणा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे येथील टिपटाॅप प्लाझा येथे स्वयम पुनर्वसन केंद्र आणि ठाणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने शनिवारी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साहित्य आणि उपकरण वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साहित्य आणि उपकरण वाटप कार्यक्रमाचे आयोजन स्वयम पुनर्वसन केंद्र आणि ठाणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. दिव्यांगांना एक मदतीचा आधार देण्याचे काम या संस्था करत आहेत, असे शिंदे म्हणाले.

दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा

दिव्यांग म्हणजे परमेश्वराने त्यांच्याकडून काही तरी काढून घेतलेले असले तरी त्यांच्यात काही तरी विशेषपण असते. यामुळेच अनेक दिव्यांग बांधव विविध क्षेत्रात चांगले काम करत आहेत. काही कलावंतर आहेत तर, काही अधिकारी आहेत. त्यांच्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि अशीच कृपा त्यांच्यावर सदैव राहो. देवाचे असेच आर्शीवाद त्यांना मिळाले पाहिजेत. दिव्यांग सेवा ही ईश्वर सेवा आहे. आता मुंबईतही स्वयम संस्थेचे काम सुरू होणार असल्याने तेथील दिव्यांग बांधवांना त्याचा फायदा होणार आहे, असे शिंदे म्हणाले.

दिव्यांग मंत्रालय निर्मितीमागचे कारण

या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका मावशींनी आनंद दिघे यांचे नाव घेतले. आनंद दिघे यांनीही दिव्यांग बांधवांना असाच मदतीचा हात देण्याचे काम केले होते. त्यांनी ठाण्यात दिव्यांग बांधवांसाठी जिद्द शाळा काढली आणी ती आजही सुरू आहे. दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, असे आनंद दिघे हे नेहमी आम्हाला सांगायचे. म्हणूनच मी मुख्यमंत्री असताना राज्यात दिव्यांग मंत्रालयाची निर्मीती केली आणि असे मंत्रालय स्थापन करण्यामध्ये आपले राज्य देशातील पहिले राज्य ठरले, असे शिंदे म्हणाले.

लाडकी बहिण योजना बंद होणार नाही

लाडकी बहिण योजना सुरू केली. त्याचा २ कोटी ८० लाख बहिणींनी लाभ घेतला. सर्व लाडक्या बहिणींनी विधानसभेत भरभरून आर्शीवाद दिल्याने महायुती सत्तेवर आली. मी आपल्याला सांगू इच्छितो की, लाडकी बहीण योजना सुरू करताना हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि ही योजना बंद होऊ देणार नाही, असे शिंदे म्हणाले.