Ravindra Chavan political strategy against eknath Eknath Shinde भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या तशा नव्या नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यापासून शिंदे नाराज आहेत. या नाराजीतून ते अधूनमधून साताऱ्यातील दरे या आपल्या गावी जात असतात. आता या नाराजीची दखल माध्यमेही क्वचितच घेतात. आठवडाभरापूर्वी घडलेल्या काही घडामोडींमुळे शिंदे आणि भाजपमधील काही ठराविक नेत्यांचे बरेच बिनसले आहे हे मात्र नेमकेपणाने स्पष्ट झाले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील १२ माजी नगरसेवकांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये ओढून आणले.
आपआपल्या प्रभागांमध्ये मातब्बर समजले जाणारे हे स्थानिक पुढारी खासदार डाॅ.श्रीकांत यांच्या गळाला लागणार नाहीत यासाठी जे काही करावे लागते ते सर्व चव्हाण यांनी केले. कल्याण, डोंबिवली या दोन शहरांमध्ये गेली दोन दशके शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेतील फुटीनंतर हा सगळा प्रदेश डाॅ.श्रीकांत यांनी ताब्यात घेतल्यासारखी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाणांच्या माध्यमातून भाजपने शिंदेच्या बालेकिल्ल्यात आखलेले हे ॲापरेशन लोटस कल्याण डोंबिवलीपुरते मर्यादित नसेल अशीच चर्चा आता आहे.
चव्हाणांना जाणीवपूर्वक बळ
एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरांवर त्यांनी एकहाती अंमल राखण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद होते तेव्हा रविंद्र चव्हाणांकडे भाजपने सार्वजनिक बांधकाम विभागासारखे प्रभावी खाते सोपविले. एका अर्थाने चव्हाणांना भाजपने बळच दिले. तरी शिंदे पिता-पुत्रांनी चव्हाणांचे त्या अडीच वर्षात डोंबिवलीतही फार काही चालू दिले नाही. चव्हाण त्यावेळी पालघरचे पालकमंत्री होते. पालघरसह कोकण पट्टीत पक्ष संघटनेला ताकद मिळावी यासाठी चव्हाण यांना भाजपने मोकळा हात दिला. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले. ठाणे, डोंबिवलीत मात्र चव्हाण यांना प्रशासकीय कामकाजात फार वाव मिळणार नाही अशीच आखणी शिंदेंकडून केली गेली.
मंत्री असूनही कल्याण डोंबिवली महापालिकेत चव्हाणांच्या आदेशांना, सूचनांना फार किंमत नसायची. विधानसभा निवडणुकांच्या काळात राज ठाकरे महायुतीच्या सतत संपर्कात होते. दादर-माहीम आणि कल्याण ग्रामीण हे दोन मतदारसंघ तरी शिंदेनी मनसेसाठी सोडावेत असा राज यांचा आग्रह होता. मुलगा अमित आणि बिनीचा शिलेदार राजू पाटील यांच्यासाठी राज यांनी शिंदे यांच्याकडे शब्द टाकला होता, अशी त्यावेळी चर्चा होती. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील आणि रविंद्र चव्हाण यांची पक्की मैत्री आहे. राजू यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडता येईल असा प्रस्ताव चव्हाण यांनीही शिंदे यांच्यापुढे ठेवला होता. डाॅ. यांनी मात्र हा प्रस्ताव फेटाळून लावला.
कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपने माजी आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा यांना उमेदवारी दिली. तेथून शिंदे यांचे कडवे समर्थक महेश गायकवाड रिंगणात उतरले. महेश यांची उमेदवारी मागे घ्यावी यासाठी चव्हाण आग्रही होते. तेथेही महेश यांनी माघार घेतली नाही. कल्याण डोंबिवली, ठाणे यासारख्या पट्टयात चव्हाण यांना फार वाव रहाणार नाही अशीच पाउले शिंदे पिता-पुत्राकडून पडली. अवघ्या वर्षभरात आता फासे शिंदे यांच्या दिशेने उलट पडल्याचे चित्र आहे. शिंदे यांच्याकडे आता मुख्यमंत्रीपद नाही. चव्हाण भाजपचे थेट प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात.
पक्षीय पातळीवर किमान आपल्या शहरात कोणते निर्णय घ्यायचे याचा पूर्ण अधिकार सध्या तरी चव्हाणांना आहे. शिंदे नगरविकास मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री असताना चव्हाणांनी जे सहन केले त्याची परतफेड करण्याची संधी त्यांना चालून आली आहे. शिंदे पिता-पुत्राचा निकटवर्तीय असणाऱ्या दिपेश म्हात्रे यांना आपल्या गोटात खेचून चव्हाण यांनी पहिली चाल खेळली आहे. ‘कल्याण डोंबिवलीचा महापौर भाजपचा असेल आणि तोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द मानणारा’ असे वक्तव्य करुन चव्हाण यांनी शिंदे यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. या लढाईतील हा पहिल्या टप्पा आहे. शिंदे यांना महायुतीची कास सोडणे तसे सोपे नाही. त्यामुळे भाजपच्या या खेळीमुळे शिंदे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.
भाजप नेत्यांच्या रडारवर शिंदे
रविंद्र चव्हाण हे अतिशय शांत आणि संयमीपणे शिंदे यांना कोंडीत गाठताना दिसतात. दुसरीकडे मात्र वन मंत्री गणेश नाईक आणि भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी शिंदे यांना थेट लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नाईक मंत्री झाल्याझाल्या शिंदे यांच्यावर घसरले तेव्हापासून भाजपच्या गोटात संशय यावा इतकी शांतता दिसून आली आहे. ‘ठाण्यात सत्ता आणायची असेल तर अंहकारी रावणाचे दहन करा’ हे नाईकांचे विधान तर शिंदे समर्थकांसाठी धक्कादायक होते.
मिळेल तेव्हा आणि मिळेल तिथे नाईक शिंदे यांना लक्ष्य करताना दिसतात. संजय केळकरही ठाणे महापालिकेच्या कारभारावर सडकून टिका करतात. ही महापालिका भ्रष्ट आहे आणि ठराविक नेत्यांच्या तावडीतून हा कारभार सोडवा, असे आवाहन यापुर्वी देखील केळकर यांनी केले आहे. नाईक-केळकर इतक्या आक्रमकपणे शिंदेवर आसूड ओढत असताना फडणवीस-चव्हाण शांतपणे हे सगळे पहात असल्याचे चित्र आहे. नाईकांचा बोलविता धनी कोण याचे उत्तर तर अलिकडे शिंदे समर्थकांनाही सापडू लागले आहे.
काहीही झाले तरी ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईत युती नको असाच भाजप नेत्यांचा सुर आहे. अंबरनाथ, बदलापूर शिंदेसेना भाजपपेक्षा ताकदवान आहे. तेथेही युती करा असा प्रस्ताव भाजपने शिंदेपुढे कधी ठेवलाच नाही. बदलापूरचे आमदार किसन कथोरे यांनी तर थेट अजित पवार यांच्या पक्षासोबत युती जाहीर केली. याच भागातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार यांनाही कथोरेंनी आपल्यासोबत घेतले आहे. शिंदे यांच्या पक्षाची चहुबाजूंनी कोंडी होईल अशीच पावले सध्या भाजप स्थानिक पातळीवरही उचलताना दिसते.
महायुती…असून अडचण, नसून खोळंबा
शिवसेनेतील बंडानंतर शिंदे यांनी अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या पाठीमागे ‘महाशक्ती’ असल्याचा उल्लेख ठरवून केला आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांसोबत असलेली त्यांची जवळीक लपून राहीलेली नाही. काहीही अडले नडले की ते दिल्ली वारी करतात असाही आजवरचा अनुभव आहे. गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रातील एकही दौरा ते चुकवत नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या असाच सुर आजवरच्या त्यांच्या भाषणातून दिसतो.
नवी मुंबईतही ते महायुतीचा भगवा फडकवा असे म्हणाले. त्यामुळे त्यांचा कल युतीकडे अधिक दिसतो. युती झाली नाही तर मैत्रीपुर्ण लढतीचा प्रस्ताव त्यांच्यापुढे असेल. मात्र निवडणुकांच्या रणसंग्रामात मैत्रीपुर्ण वगैरे काही नसते याची जाणीव शिंदे यांना आहेच. ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीत भाजपशी दोन हात करणे त्यांना राजकीयदृष्ट्या फारसे सोयीचे नाही. भाजपवर टिका कशी करायची असा चक्रव्युह त्यांच्यापुढे आहेच. भाजपमध्ये आक्रमकपणे शिंदेना या चक्रव्युहात खोल ढकलताना दिसत आहे. शिंदे तो कसा भेदतील हा खरा प्रश्न आहे.
