ठाणे : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महायुतीने जिंकल्या. त्यापाठोपाठ आता विकास कामांच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती बहुमताने जिंकले आणि मुंबई महापालिकेतही महायुतीचीच सत्ता येईल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टिका केली.
ठाण्यातील टेंभीनाका येथील दुर्गेश्वरी देवीच्या मंडपाची पाहाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि यानंतर ते आनंदाश्रम येथे गेले. तिथे पालघर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख, शहर महिला संघटक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपतालुका प्रमुख आदींसह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईत रस्ते, एसटीपी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, मेट्रो, कारशेड यांसारखे विषय आम्ही मार्गी लावले. क्लस्टर धोरणाद्वारे मुंबईबाहेर गेलेले मुंबईकर पुन्हा शहरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सिडको, एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि मुंबई महापालिका यांच्या मदतीने रखडलेले प्रकल्प गतीमान केले जात आहेत, असे शिंदे म्हणाले.
लोकसभेत आणि विधानसभेत महायुती जिंकली असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही जिंकेल आणि महापालिकांवर महायुतीचा भगवा फडकेल. तसेच विकासकामांच्या जोरावर महायुती मुंबई महापालिकेत सत्तेवर येईल, असे ते म्हणाले.
राहुल गांधींवर टिका
जेव्हा विजय मिळतो, तेव्हा ते गप्प बसतात, पण पराभव झाला की निवडणूक आयोग, ईव्हीएम आणि मतदार यादी यांच्यावर बोट ठेवतात, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या आरोपांवर दिले आहे. निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि काँग्रेसला स्पष्ट सांगितले आहे की, आरोप करायचे असल्यास पुरावे द्या. मात्र काँग्रेस केवळ आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे. कर्नाटकात काँग्रेस आमदार विजयी झाले, मग मतचोरी कशी झाली? तेलंगणा आणि महाराष्ट्रात जागा जिंकल्या, तेव्हा का आरोप केले नाहीत? मग हरल्यावरच मशीनवर शंका घेणे म्हणजे केवळ दिशाभूल करणे आहे,” असे शिंदे म्हणाले. ईव्हीएम प्रक्रिया ही काँग्रेसच्या काळात सुरू झाली होती. जर तीच चुकीची असेल, तर त्यांनीच सुरू केलेल्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करायचे आहे का असा सवाल शिंदे यांनी केला.