ठाणे : बुधवारी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकाचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात मार्मिकच्या आठवणी जागवताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संत एकनाथांच्या भारुडाचा दाखला देत एकनाथ शिंदे यांच्यावर तोतया एकनाथ अशी टीका केली होती. या टिकेनंतर शिवसेनेने गुरुवारी सकाळी उद्धव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्रांच्या चित्रफितीतून जोरदार हल्ला केला आहे. विंचू चावला हे भारुड वापरत ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेले मार्मिक हे व्यंगचित्रांचे साप्ताहिक त्या काळात विविध विषयांवर मार्मिक भाष्य करत होते. त्याचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी संपन्न झाला. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मार्मिक भाषेतून अनेक राजकीय भाष्य केले. जुन्या परंपरांचा, माध्यमांचा दाखला देत मार्मिक ची गरज आणि योग्यता सांगितली. यावेळी त्यांनी संत एकनाथ यांच्या भारुडाचा दाखला दिला. भारुडाच्या माध्यमातून लोकांच्या काम, क्रोध, सत्तेची लालसा यावर संत एकनाथांनी भाष्य केले होते.
विंचू चावला या भारुडाचे उदाहरण देताना त्यांनी एकनाथांचा उल्लेख केला. मात्र आत्ताचे एकनाथ नाही, हे तोतया एकनाथ आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली.
या टीकेला काही तास उलटत नाही तोच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावर एक चित्रफीत पोस्ट करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी दाखला दिलेल्या विंचू चावला या भारुडाचे गाणे वापरत उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाने यापूर्वी तयार केलेल्या विविध व्यंगचित्रांचा समावेश त्या चित्रफितीत करण्यात आला आहे.
सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असे या चित्रांमधून दाखवण्यात आले आहे. सध्या समाज माध्यमांवर या चित्रफितीची चर्चा रंगली आहे. मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी मार्मिक पद्धतीने शिंदे गटाने ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे बोलले जाते. यावर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.