Eknath Shinde on Rahul Gandhi : ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीन राज्यात मतचोरी झाल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाविरोधात पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला होता. दरम्यान, मतदार यादीतील घोळावर केलेल्या दाव्यांबद्दल शपथपत्र देण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना केले आहे. निवडणूकीत मतचोरी झाल्याचा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
ठाण्यात रविवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या वतीने मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले. निवडणूका जिंकतात तेव्हा निवडणूक आयोगावर आरोप करत नाही. निवडणूक आयोगाने त्यांना शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते. परंतु ते कोणतेही शपथपत्र करत नाहीत कारण, त्यांना माहिती आहे त्यांचा आरोप खोटा आहे.
जेव्हा ते लोकसभा जिंकले, तेलंगणा जिंकले, कर्नाटक जिंकले तेव्हा त्यांनी आरोप केला नाही. परंतु जेव्हा विधानसभा हरले. तेव्हा त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली. त्यांना पराभव, जनतेचा कौल पचविता येत नाही. हा आरोप म्हणजे लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकऱ्यांचा, महाराष्ट्रातील तमाम मतदारांचा अपमान आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
हा लाडक्या बहिणींचा, शेतकऱ्यांचा अपमान
आम्ही एकीकडे विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घातली. त्यामुळे आम्हाला दैदिप्यमान विजय मिळाला. हा विजय त्यांना पचत नाही. त्यांना पोटदुखी झाली आहे. त्यांनी बाहेर आरोप करण्यापेक्षा निवडणूक आयोग, न्यायालयामध्ये जावे. राज्यातील जनता सुज्ञ आहे, मागील अडीच ते तीन वर्षांत केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे जे घरी बसतात, त्यांना कायमचे घरी बसविण्याचे काम जनतेने केले आहे. २३२ चे संख्याबळ कधीही महाराष्ट्राने पाहिले नव्हते. विरोधी पक्षनेता होण्याइतकेही संख्याबळ त्यांच्याकडे नाही. हे कटू सत्य पचविता आले पाहिजे. लोकसभेत आम्ही जनतेचा कौल मान्य केला होता. परंतु ते फक्त आरोप करतात असेही शिंदे म्हणाले.
ठाण्यातील वाहतुक कोंडी सुटेल
– ठाण्यातील वाहतुक कोंडी विषयी त्यांना विचारले असता, काही काळानंतर ठाण्यातील वाहतुक कोंडी सुटलेली दिसेल. खाडी किनारी मार्ग बनविण्यात येणार आहे, प्रदूषणमुक्त आणि हरित ठाणे होईल असा दावाही त्यांनी केला. तसेच ठाण्यातील अंतर्गत मेट्रोला मंजूरी मिळाली आहे. ही मेट्रो शहरातील मुख्य मेट्रो मार्गिकेशी जोडली जाणार असल्याचेही ते म्हणाले.