Rain Updates, Thane Rain Alert ठाणे – शहरात सोमवारपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका नौपाडा भागातील भांजेवाडी परिसराला बसला असून येथील ६३ घरांमध्ये पाणी शिरले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन येथील रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला. नागरिकांची गैरसोय होणार नाही असा दावा शिंदे यांनी यावेळी केला. परंतु, या वाडीच्या आजूबाजूला झालेल्या इमारतींमुळे येथील रहिवाशांना पावसाच्या पाण्याचा फटका बसल्याचे दिसून आले.
मुंबईसह ठाण्यात सोमवार पासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळपासून या पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यावरही पाणी साचल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. नौपाड्यातील भांजेवाडी या परिसरात जवळपास ६३ रहिवाशांच्या घरात पाणी शिल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सकाळ पासून येथील रहिवासी घराबाहेर पडून पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. दरम्यान सकाळी ११.३० च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या परिसरातील रहिवाशींची भेट घेतली. त्यांनी रहिवाशांना दिलासा देण्याचे काम केले. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या वाडीत साचलेल पाणी पंप लावून काढण्याचे निर्देश दिले. जीवीतहानी होऊ नये यासाठी देखील प्रशासनाला सर्तक राहण्याच्या सुचना शिंदे यांनी दिल्या. तर, आवश्यकता असेल तरच नागरीकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना यावेळी केले. तर, ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप लावण्यात आले असल्याचा दावा देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला.
दुसरीकडे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील येथील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी जाण्यासाठी विनंती केली होती. परंतु रहिवाशांनी आम्ही आमचे घर सोडून कुठेही जाणार नसल्याचे सांगितले. आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचे सांगत ज्या ज्या रहिवास क्षेत्रात पाणी साचत आहे, तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी महापालिकेच्या शाळा आणि इतर वास्तु देखील सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी नाले तुंबले आहेत, त्याठिकाणचे पाणी देखील काढण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.