या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरबाप्रेमींना दुचाकी, आयफोन, टीव्हीची आमिषे  

येत्या पाच महिन्यांत होऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आपली मतपेढी मजबूत करण्यासाठी आणि तरुण तसेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदाच्या नवरात्रोत्सवात राजकीय मंडळींनी बक्षिसांची जोरदार लयलूट देऊ केली आहे. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या उत्सवांच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धाचे आयोजन करत विजेत्यांना दुचाकी, मोबाइल, टीव्ही, फ्रीज अशा बक्षिसांचे आमिष दाखवण्यात येत आहे. नऊ रात्री जागवत आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी दसऱ्याला केली जाणार आहे. यानिमित्ताने विविध राजकीय नेत्यांनी गरबा विजेत्यांसाठी बक्षिसांची आरास मांडली असून शहरातील काही झोपडपट्टी परिसरात तर सोन्याची नाणीही वाटली जाणार आहेत.

ठाणे महापालिका निवडणुका जवळ आल्याने विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार यंदा सण, उत्सवांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा तसेच त्यांना खूश  करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. नवरात्रोत्सव, दसऱ्याचे औचित्य साधून दरवर्षी होणारे बक्षिसांचे वाटप काही नवे नाही. यंदा मात्र निवडणुकीच्या हंगामात या बक्षीस वाटपाला मोठा जोर चढला असून झळाळीदेखील वाढल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या राजकारणात कोण किती जागा लुटणार याची चर्चा सुरू असताना येथील रघुनाथनगर परिसरात एका  नवनिर्वाचित आमदाराने तर बक्षीस वाटपाचा केलेला आगळावेगळा संकल्प पाहून आबालवृद्धांची मोठी गर्दी येथे होऊ लागली आहे. या ठिकाणी गरबा विजेत्यांसाठी दसऱ्याला अ‍ॅपल आयफोन ५, एलईडी टी.व्ही., रोख रक्कमेची आकर्षक बक्षिसे आहेतच शिवाय मतदारांना खूश करण्यासाठी ही बक्षिसे ‘सैराट’ सिनेमातील कलाकारांच्या हस्ते दिली जाणार आहेत. वागळे इस्टेट येथे नव्याने राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या काही सोम्या-गोम्यांनीही बक्षीस वाटपांच्या या स्पर्धेत भाग घेतला आहे. येथील रुपादेवी टेकडी येथे एका नवनेत्याने उत्तम दांडिया खेळणाऱ्यांना दुचाकी, टी.व्ही., फ्रीज, कॅमेरा सारखी मोठी बक्षिसे देऊ केल्याने या भागातील रहिवाशांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठाण्याचा सांस्कृतिक चेहरा असणाऱ्या नौपाडा परिसरातही पारंपरिक उत्सवाची जागा आता बक्षीसप्रिय गरब्याने घेतल्याचे चित्र दिसू लागले आहे. घोडबंदर भागात काही बडय़ा गृहसंकुलांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या गरबा उत्सवात भरजरी पैठण्यांचे वाण मोठय़ा प्रमाणावर लुटले जात असून विशेष म्हणजे गर्भश्रीमंत वस्त्यातही या पैठण्यांचे औत्सुक्य पाहायला मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे दिसून येते. अशा प्रकारे बक्षिसांची उधळण करून मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न उमेदवार करताना दिसत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election in thane
First published on: 11-10-2016 at 01:33 IST