थकबाकीदारांची महावितरणला डोकेदुखी

वसई-विरार शहरात साडेसात लाख वीजग्राहक आहेत.

वसई-विरारमध्ये ८६ हजार फुकट वीजग्राहक, ६५ कोटींचा फटका

वसई-विरार शहरात वीजचोरीच्या घटना वाढत असताना शहरातील ८६ हजार वीजग्राहकांनी महावितरणाचे तब्बल ६५ कोटी रुपये थकवल्याची बाब समोर आली आहे. या ग्राहकांच्या मीटर जोडण्या महावितरणाने खंडित केल्या असल्या तरी ते चोरूनी वीज वापरीत असल्याचे दिसून आले आहे.

वसई-विरार शहरात साडेसात लाख वीजग्राहक आहेत. वीजचोरांमुळे महावितरणाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. महावितरणाने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षांत वीजचोरीची ३ हजार १६५ प्रकरणे उघडकीस आणली होती. वीज चोरणाऱ्या ग्राहकांना ५ कोटी ३७ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर दीड हजार ग्राहकांवर वीज कलमांअंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र वीजचोरीप्रमाणे वीज बिलांचे वाढते थकबाकीदार महावितरणाची डोकेदुखी ठरू लागली आहे. वारंवार नोटिसा बजावूनही जे वीजबिले भरत नाही, त्यांच्या वीजजोडण्या खंडित केल्या जातात. महावितरणाने गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ९५ हजार ६५० वीजजोडण्या खंडित केल्या होत्या. या ९५ हजार वीजग्राहकांनी महावितरणाचे तब्बल ७२ कोटी ७० लाख रुपये थकवले होते. या वीज थकबाकीदारांनी आपली थकीत रक्कम भरावी यासाठी महावितरणाने नवप्रकाश योजना सुरू केली. जर थकबाकीदाराने मूळ रक्कम भरली तर कुठलाही दंड न आकारता तात्काळ मीटर जोडणी करून देण्यात येणार होती. मात्र त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही.

ही योजना ३१ मार्चपर्यंत होती. तिला जून आणि नंतर ३१ जुलैपर्यंत दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु या ९५ हजार थकबाकीदारांपैकी केवळ ९ हजार ९०३ वीज थकबाकीदारांनीच बिले भरली आहेत. त्यापोटी महावितरणाला केवळ  ६ कोटी ५२ लाख रुपये रक्कम मिळाली आहे. म्हणजे अद्यापही महावितरणाकडे ६५ कोटी रुपये थकवण्यात आले आहे. आता पुन्हा या योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता थकबाकीदारांनी मूळ रक्कम भरली तरी २५ टक्के दंड आकारून वीजजोडणी दिली जाणार आहे.

मोहिमांचा फायदा नाही

थकबाकीदारांमध्ये वसई विभागात ४१ हजार आणि विरार विभागात ५३ हजार वीज ग्राहकांचा समावेश आहेत.

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि कृषी या सर्व प्रकारांत हे थकबाकीदार आहेत.

वीज थकबाकीदारांनी वीज बिल भरावे यासाठी विशेष मोहिमा आखण्यात आल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

उद्योग क्षेत्रात, रहिवासी संकुलात बैठकांचे आयोजन केले, पत्रके वाटली तसेच सार्वजनिक ठिकाणी भित्तिपत्रके चिकटवून वीजग्राहकांना आवाहन केले, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

थकबाकीदारांकडून वीजचोरी?

९५ हजार वीज बिले थकबाकीदारांपैकी महावितरणातने ९ हजार ९०३ ग्राहकांच्या जोडण्या पूर्ववत करून दिल्या आहेत. अद्याप सुमारे ८६ हजार ७४२ वीज थकबाकीदांरांनी वीजजोडण्या नाहीत. मग हे वीज थकबाकीदार कुठली वीज वापरतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचे उत्तर महावितरणाकडे नाही. हे वीज थकबाकीदार चोरून किंवा बेकायदा वीजजोडण्या घेऊन वीज वापरीत असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महावितरणाला कोटय़वधी रुपयांचा आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.

एकूण ग्राहक- ७.५ लाख

  • थकबाकीदारांच्या खंडित जोडण्या- ९५ हजार ६४५
  • थकबाकी – ७२ कोटी ७० लाख

अक्षय प्रकाश योजनेनंतर

  • थकबाकीदारांच्या पूर्ववत केलेल्या जोडण्या- ९ हजार ९०३
  • वसूल रक्कम- ६ कोटी ५२ लाख
  • शिल्लक थकबाकीदार- सुमारे ८६ हजार ७४२

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Electricity bill outstanding issue mahavitran

ताज्या बातम्या