नवी मुंबई तसेच ठाणे येथे ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शीव येथे तीन मार्गिकांचा उड्डाणपूल, छेडानगर येथे उड्डाणपुलावर पूल आणि छेडानगर व अमरमहाल या पुलांना जोडणारा उन्नत मार्ग असे महत्त्वाचे प्रकल्प उभारण्याची घोषणा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
पूर्व मुक्त मार्ग व सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्यावरून येणाऱ्या वाहनांमुळे छेडानगर येथे वाहतूक कोंडी होते. त्यासाठी शीव येथे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन मार्गिकांच्या उड्डाणपुलास समांतर असा तीन मार्गिकांचा व ६८० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. नवी मुंबईहून येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी दोन मार्गिकांचा व १२४० मीटर लांबीचा उड्डाणपूलही बांधण्यात येईल. हा उड्डाणपूल सध्याच्या छेडानगर उड्डाणपुलावरून पूर्व द्रुतगती मार्गावर जाईल. तसेच छेडानगर उड्डाणपूल व अमरमहाल उड्डाणपूल यांना जोडणारा ६५० मीटर लांबीचा व दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग (इलिव्हेटेड रोड) बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत २४९ कोटी २९ लाख रुपये आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी १६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वांद्रे-कुर्ला संकुलापासून चुनाभट्टीपर्यंतचा उन्नत मार्ग, खेरवाडी उड्डाणपुलाची उत्तरेकडील बाजू, अंधेरी-घाटकोपर जोडरस्ता हे प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहेत.सध्या मुंबईत राजकीय वादाचा विषय ठरलेल्या कुलाबा-सीप्झ या तिसऱ्या मेट्रोसाठी १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे वडाळा ते संत गाडगेमहाराज चौकदरम्यानच्या मार्गासाठी ४०२ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद २०१५-१६ मध्ये करण्यात आली आहे.