भावनांशी मैत्री कशी करावी, त्यांच्यात साठलेल्या ऊर्जेचा वापर करून आयुष्यात आनंद कसा निर्माण करावा, चांगले नातेसंबंध कसे प्रस्थापित करावेत या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी २ डिसेंबर रोजी इक्विपकिड्सतर्फे ‘भावनांचा महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. त्यात भावना, भावनिक बुद्धिमत्ता, भावनिक साक्षरता आणि न्युरोसायन्सवरील कृती प्रयोग, प्रात्यक्षिके, खेळ यांचा अनुभव उपस्थितांना घेता येईल. या महोत्सवासाठी ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली १० वर्षे भावनिक साक्षरता आणि भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनांचा संपूर्ण देशात प्रचार आणि प्रसार करत आहे. याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात भावनांक (ईक्यू) या संकल्पनेवरच्या मूलभूत संशोधनाची माहिती देण्यात येईल. कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ताणताणाव कमी करण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेचा कसा उपयोग करण्यात येतो हे दर्शवणारे रंजक खेळ, कृतीप्रयोग दाखवण्यात येतील.

मुलांचे भावनिक आत्मभान अगदी लहान वयापासून वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण खेळ, कृतीप्रयोग स्वत: करण्याची संधी मुलांना आणि प्रौढांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये भावना ओळखणे, त्यांचे कार्यकारण समजणे, भावनांना आचूक शब्द देता येणे, भावनांची भाषा अवगत असणे आणि त्यांचे नियमन करता येणे ही भावनिक कौशल्ये विविध शाळांमध्ये कशी जोपासली जातात यावर गमतीदार प्रयोग दाखवण्यात येतील. मुलांमध्ये विविध भावनांक कौशल्ये कशी रुजवावीत, भावनांचा अभ्यासक्रम कसा बनवावा, याचे प्रयोग दाखविण्यात येतील.

गेल्या दशकात अनेक प्रयोगांतून, संशोधनांतून भावनिक बुद्धिमत्ता मोजण्याचे, वाढवण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. शाळा, घर आणि अनेक प्रख्यात कंपन्यांमध्ये एवढेच नव्हे, तर अगदी विविध देशांतील सैन्यांमध्येही भावनांक या संकल्पनेचा उपयोग करण्यात येत आहे. या संदर्भातील उपयुक्त माहिती महोत्सवात उपलब्ध होणार आहे.

कधी, कुठे?

स्थळ – इक्विपकिड्स, पहिला मजला, युनिट न.२३. दोस्ती इम्पेरिया शॉप, आर मॉलसमोर, कोटक महिंद्र बँकेजवळ, घोडबंदर रस्ता, ठाणे (प.)

वेळ – रविवार २ डिसेंबर, सकाळी १० ते २

अधिक माहितीसाठी संपर्क- ९९४८०६०७७

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional literacy festival in thane
First published on: 29-11-2018 at 02:18 IST