पारंपरिक शेती व्यवसायातून बाहेर पडत काही नावीन्यपूर्ण केले की चार पैसे अधिक मिळतात, याचा अनुभव शहापूरमधील काही आदिवासी कुटुंबांनी अलीकडेच घेतला. शहापूर तालुक्यातील चाफ्याची वाडी या परिसरातील आठ आदिवासी कुटुंबांनी आळंब्यांची लागवड केली. यातून सर्व खर्च वजा जाऊन प्रत्येक कुटुंबाला दोन हजार रुपये नफा मिळाला. शंभर किलो आळंबी पिकवून मिळालेल्या या यशानंतर आता ५०० किलो आळंबी लागवड करण्याचा निश्चय घेतला आहे.
शहापूर तालुक्यात खराडे ग्रामपंचायत अंतर्गत येणारे चाफ्याची वाडी ही आदिवासींची वस्ती अतिशय दुर्गम भागात आहे. अगदी मूलभूत सुविधांपासूनही हे गाव वंचित आहे. येथील आदिवासी बांधवांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी कर्वे समाजसेवा संस्था आणि माझगाव डॉगशिप बिल्डर्स यांच्यातर्फे सामाजिक बाधीलकीअंतर्गत गाव विकास प्रकल्प राबविण्यात येतात.
याच माध्यमातून ५०० किलो आळंबी पिकविण्यासाठी एक मोठे दालन तयार करण्यात येत आहे. या दालनात एकाच वेळी ५०० किलो आळंबी पिकविता येणार आहेत. त्यासाठी पुणे येथील शेतकी महाविद्यालयातून आळंबीचे बियाणे मागविण्यात आले आहेत.
याआधी पिकविलेले १०० किलो आळंबी एका संस्थेला विकण्यात आले असून येत्या काही दिवसांत दालन तयार करण्यात येणार आहे. १४५ रुपये किलो या प्रमाणे हे आळंबी विकले जात असल्याचे कर्वे समाजसेवा संस्था आणि माझगाव डॉगशिप बिल्डर्सचे प्रकल्प प्रमुख धनंजय गीते यांनी सांगितले. या प्रकल्पात चाफ्याच्या वाडीतील ४० कुटुंब सहभागी होणार असून त्यांना कायमस्वरूपी हा व्यवसाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.