उल्हासनगरः उल्हासनगरच्या कॅम्प तीन भागातील सी ब्लॉक परिसरात गुरूवारी मध्यरात्री एक रिकामी करण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळली. शिव जगदंबा अपार्टमेंट असे या इमारतीचे नाव असून ती पाच मजल्यांची होती. धोकादायक झाल्याने या इमारतीला पालिकेने रिकामी केले होते. त्यामुळे येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र इमारत कोसळल्याने आसपासच्या इमारतींचे नुकसान झाले. त्यामुळे परिसरात भितीचे आणि संतापाचे वातावरण होते. पालिकेने ही इमारत वेळेत जमिनदोस्त करण्याची गरज होती, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.
उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करून जमिनदोस्त करण्यासाठी पालिका प्रशासन दरवर्षी अशा इमारतींची यादी जाहीर करत असते. त्यातील काही इमारती रिकाम्या केल्या जातात. मात्र त्या वेळेत जमिनदोस्त केल्या जात नाहीत. अशा इमारतींचे काही भाग कोसळून आसपासच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यापूर्वीही उल्हासनगरात इमारतीचे काही भाग कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्याच महिन्यात एका इमारतीच्या परिसरात दुरूस्तीचे काम करणाऱ्या कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या घटना उल्हासनगर शहरात सुरूच आहेत.
त्यातच उल्हासनगर शहरातील कॅम्प तीन भागातील सी ब्लॉक परिसरात एक रिकामी करण्यात आलेली इमारत कोसळली. शिव जगदंबा अपार्टमेंट ही इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत होती. महापालिकेने तिला आधीच धोकादायक घोषीत केले होते. त्या इमारतीला रिक्त करण्यात आले होते. या इमारतीत एकूण २९ सदनिका आणि २ दुकाने होती. इमारत रिकामी असली तरी ती पाडण्यात आली नव्हती. त्यामुळे आसपासच्या नागरिकांना एक दिवस ती पडण्याची भीती होती. अखेर गुरुवारी रात्री इमारतीचा मागील भाग छतासह तळमजल्यापर्यंतचा संपूर्ण भाग कोसळला. यावेळी मोठा आवाज झाल्याने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली. या इमारतीचा कोसळलेला भाग आसपासच्या इमारतींवरही पडले. त्यामुळे शेजारच्या इमारतीतील नागरिकांत घबराट पसरली. यात काही घरांचे नुकसानही झाले आहे.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी येथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले. जीवितहानी झाली नसल्याचे समाधान आहे मात्र ही इमारत पाडण्यासाठी पालिकेने वेळेत निर्णय घेतला असता तर शेजारच्या घरांचे नुकसान झाले नसते, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.