scorecardresearch

शिळफाटा-दहिसर रस्त्यावरील अतिक्रमणे महिनाभरात हटविणार

भंगाराच्या गोदामांसाठी या रस्त्यावरील मोऱ्या, नाले बुजविण्यात आले आहेत. साधा पाऊस पडला तरी या भागतील रस्ते जलमय होतात.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा निर्णय

डोंबिवली : ठाणे-पुणे महामार्गावरील शिळफाटा ते दहिसर-मोरी गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनधिकृत भंगार गोदामे तसेच अति क्रमणे महिन्याभरात हटविण्यात येतील अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. महिन्याभरात ही कारवाई हाती घेतली जाईल, असे आश्वासन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांना सोमवारी दिले.

शिळफाटा-दहिसर रस्त्यावर सुमारे १२५ हून अधिक गोदामे आहेत. या गोदामांची अवजड यंत्र भंगार सामग्री रस्त्याच्या सीमारेषा पट्टय़ात ठेवण्यात आली आहे. दुकानाचा गाळा १० फुटाचा आणि त्याच्या समोरील सामग्री ढीगभर असे चित्र या रस्त्यावर आहे. भंगाराच्या गोदामांसाठी या रस्त्यावरील मोऱ्या, नाले बुजविण्यात आले आहेत. साधा पाऊस पडला तरी या भागतील रस्ते जलमय होतात. पूर परिस्थिती असेल तर चार ते पाच फूट पाणी दहिसर भागात असते. भंगार साहित्यावर पडलेले पावसाचे पाणी आजुबाजुच्या भातशेती, माळरानावर वाहून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन नापीक होऊ लागली आहे, अशा तक्रारी आमदार प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या.

तक्रारीच्या अनुषंगाने तहसीलदार युवराज बांगर, एमएमआरडीए अधिकारी, आमदार पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे गेल्या आठवडय़ात शिळफाटा ते दहिसर गावांदरम्यानची पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.  १४ गाव परिसरातील शेतीही रसायनयुक्त पाणी, रासायनिक कचऱ्यामुळे नापीक होण्याची वेळ आली आहे, अशी माहिती आमदार पाटील यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिली होती.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी आमदार पाटील यांनी दहिसर-शीळफाटा भागातील समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

निर्बंध हटवा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. पालिका हद्दीतील प्रतिबंधाचे निर्बंध उठवावेत. रहिवाशांना नववर्ष स्वागत यात्रेसारखे उत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडण्याची संधी द्या, अशी मागणीही आमदारांनी केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Encroachments on shilphata dahisar road will be removed within a month collector rajesh narvekar zws

ताज्या बातम्या