ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापालिकेत ठेकेदारांच्या राजकीय दबावामुळे कामे करणे असह्य होत असल्याची अभियंत्यांची तक्रार आहे. रिक्त पदांमुळे आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेले एक पत्र ‘लोकसत्ता’च्या हाती लागले आहे. हे पत्र आज, गुरुवारी आयुक्तांना दिले जाण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील सर्व अभियंत्यांनी एकत्र येत हे पत्र लिहिले आहे. यामध्ये काम करताना येणारा ताण, आरोग्यावर होणारा परिणाम, कंत्राटी कामांमधील राजकीय हस्तक्षेप, अभियंत्यांची कमी संख्या, याविषयी तक्रारींचा पाढा वाचण्यात आला आहे. कंत्राटी कामे करणारे बहुसंख्य ठेकेदार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीच्या ओळखीचे असतात. काही ठेकेदार तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. काम करताना असे ठेकेदार राजकीय दबाव आणतात आणि त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, असे अभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे. एखादा अभियंता चांगले काम करत असेल आणि दर्जेदार विकासकामांसाठी आग्रह धरत असेल तर अशा त्याच्या बदलीसाठीही ठेकेदार दबाव आणतात. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या अभियंत्यांना पाठींबा द्या, असे आर्जवही आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. महापालिकेमध्ये नगरअभियंता, अतिरिक्त नगर अभियंता, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कनिष्ठ अभियंता १ आणि २ या संवर्गातील एकूण २९९ पदे मंजुर आहेत. त्यापैकी १३४ अभियंते विविध पदांवर कार्यरत आहेत. तर, १६५ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता १ आणि २ या संवर्गामध्ये १९४ मंजुर पदापैकी ४८ एवढेच अभियंते कार्यरत आहेत. उपअभियंता पदाची ७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध तांत्रिक आणि अतांत्रिक कामे रोज १२ ते १५ तास आणि सुट्टीच्या दिवशीही करावी लागतात. त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे पत्रात म्हटले आहे. कामावर शंभर टक्के लक्ष देणे शक्य होत नसल्याने त्याचा कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची त्यांची तक्रार आहे.
अभियंत्यांच्या अन्य तक्रारी
काही अभियंत्यांकडे खूपच तर, काहींकडे खूपच थोडी कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे कामाची समान विभागणी करावी
अभियंत्यांच्या १० ते १५ वर्षे बदल्याच होत नसून त्यामुळे स्थानिकांचा रोष सहन करावा लागतो. त्यामुळे नियमित बदल्या करण्यात याव्यात
दैनंदिन कामे करताना मजकूर टाईप करावा लागत असून यासाठी टायपिस्ट नेमावेत
अंदाज व्यवस्थापन कक्षाची स्थापना करावी
अपंग संवर्गातील भरतीतील उमेदवाराच्या प्रमाणपत्राची चौकशी करावी