ठाणे जिल्ह्यातील खाडी आणि वाळू पात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या भरारी पथकांमध्ये स्थानिक तहसीलदार आणि त्यांच्या समवेत महसूल विभागाचे कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. तर प्रामुख्याने यात रेल्वे ट्रॅक जवळील अवैध उपसा रोखण्यासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांद्वारे सुट्टीच्या दिवसातही खाडी विभागात गस्त घालण्यात येणार असून माफियांविरोधात कारवाई सत्र राबविण्यात येणार आहे. या बाबत नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते. यानुसार या पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला ‘महारेरा’ची नोटीस

जिल्ह्यातील खाडीत असलेल्या रेल्वे पुलांच्या तळाशी आणि खाडीला लागून असलेल्या रेल्वे रुळांजवळ अवैध वाळू उपसा होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले होते. या माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हा महसूल विभागाकडून वारंवार कारवाया केल्या जात असल्या तरी हे सर्व प्रकार थांबत नसल्याचे वारंवार दिसून येत होते. या सततच्या उपशामुळे पुलाच्या तळाशी आणि रुळांनजीकची जमीन सैल होऊ लागली आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीला भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यावर ठोस उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उपायोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच खाडीतील रेल्वे पुलाखाली सुरु असलेल्या या अवैध वाळूउपसा न्यायालयाने ही या संपूर्ण प्रकाराकडे गांभीर्याने उपायोजना राबविण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपविभागीय कार्यालयातर्फे वाळू माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची स्थापना कारण्यात आली आहे. या भरारी पथकांमध्ये स्थानिक तहसीलदार आणि त्यांच्या समवेत महसूल विभागाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. तर प्रामुख्याने यात ठाणे ते कल्याण दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक जवळील अवैध उपसा रोखण्यासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांद्वारे सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत वेळोवेळी गस्त घातली जाणार आहे. तर शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसातही खाडी विभागात गस्त घालण्यात येणार असून माफियांविरोधात कारवाई सत्र राबविण्यात येणार आहे. यामुळे अवैध उपसा करणाऱ्या माफियांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला ‘महारेरा’ची नोटीस

जिल्हा प्रशासनाकडून नेमणूक करण्यात आलेल्या या भरारी पथकाकडून नुकतीच मुंब्रा खाडीतून अवैध उपसा करणाऱ्या माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. यामध्ये अधिकाऱ्यांकडून माफियांचा बार्ज आणि बोटी जाळण्यात आल्या आहेत. तर याच पद्धतीने पुढे कारवाई सूर राहणार असल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.