‘लहानग्यांची सुट्टी तर पालकांची दगदग’ असा मजेशीर काळ म्हणजे एप्रिल-मे महिन्यांतील उन्हाळी सुट्टी. सुट्टीत मुलांना घेऊन दीड-दोन महिने गावाला जाऊन राहण्याचा ट्रेंडही आता मागे पडला आहे. त्याऐवजी मुलांची सुट्टी सार्थकी लागावी म्हणून ते निरनिराळ्या शिबिरांच्या शोधात असतात. त्यातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळतोच, शिवाय त्यांचा व्यक्तिमत्त्वविकासही होतो. ठाण्यातील डिफरंट स्ट्रोक्स या संस्थेतर्फे नकुल घाणेकर यांनीउन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून नृत्य व अभिनयाची कार्यशाळा आयोजित केली आहे. हिंदी चित्रपट संगीतावर आधारित नृत्यांबरोबरच साल्सा, कंटेम्पररी या नृत्यशैलीचे मार्गदर्शन नृत्यप्रशिक्षकांद्वारे
करण्यात येणार आहे. याबरोबरच अभिनयाचे मार्गदर्शनही दिग्गज मंडळीद्वारे देण्यात येणार आहे.
’कधी :
६ एप्रिल व १३ एप्रिल
बोलक्या बाहुल्यांचे कुटुंब
शब्दभ्रमकला अर्थातच बोलक्या बाहुल्या म्हटले की रामदास पाध्येंचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. रोटरी कल्ब ऑफ मुंबई, मुलुंडतर्फे जागतिक कीर्तीचे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचा ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रामदास, अपर्णा व त्यांचा मुलगा सत्यजीत हे पाध्ये कुटुंब या वेळी त्यांची बहारदार शब्दभ्रमकला सादर करणार आहेत.
’कधी : शुक्रवार, १० एप्रिल रोजी
’कुठे : कालिदास नाटय़गृह, मुलुंड (प.)
कृष्ण नृत्यनाटिकेचा सुवर्ण महोत्सव
‘बेली डान्स’ हा नृत्य प्रकार मूळ पाश्चिमात्य असला तरी तो जर कृष्ण सादर करणार असेल तर त्याचा आनंद काही वेगळाच असेल. सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कृष्ण नृत्यनाटिकेचे सुवर्णमहोत्सवी प्रयोग या आठवडय़ाच्या अखेरीस ठाणे-डोंबिवलीत होत आहेत. यामध्ये कवी सूरदास आणि कवी माधव चिरमुले यांच्या रचना आहेत. अप्रतिम नृत्य, संगीत आणि नाटय़ाविष्कारामुळे चोखंदळ रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘कृष्ण’ या नृत्यनाटिकेचे सुवर्णमहोत्सवी प्रयोग आहे.
’कधी : शुक्रवार, ३ एप्रिल. सकाळी ११ वाजता.
’कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे.
गारेगार ‘स्लशेस्’
मार्च महिन्यापासूनच विक्रमी तापमान नोंदवून उन्हाळ्यने आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हाचा हा पारा कमी करण्यासाठी थंड पेये प्यावीशी वाटतात. गृहिणींना नेहमीच्या लिंबू आणि कोकम सरबतापेक्षा वेगळे काही करता यावे म्हणून कोरम मॉल व्यवस्थापनाने स्लशेस् बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. ‘स्लश’ म्हणजे बर्फाचा चुरा असलेले पेय. यामध्ये फ्रोझन अॅप्पल, पिना कोलाडा स्लश (अननसापासून तयार केलेले), बेरी ब्लास्ट स्लश, ट्रॉपिकल ट्विस्टर स्लश, रेडमेलन स्लश, पर्पल करंट स्लश, लेमन स्लश आणि रेन्बो स्लश असे स्लशेस्चे विविध प्रकारांचे प्रशिक्षण या वेळी देण्यात येणार आहे.
’कधी : बुधवार, ८ एप्रिल
’कुठे : कोरम मॉल, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे (प.)
पाश्चात्त्य व लोकसंगीताचे फ्यूजन
येथील विवियाना मॉलमध्ये नॅशनल स्कूल ऑफ पर्फॉर्मिग आर्टस्चे विद्यार्थी दर शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यापासून रॉक बॅण्ड सादर करतात. अभिषेक चपके आणि सुनित बोरकर हे पॉप फ्युजन सादर करणार आहेत. सुरेश काला, अजित कुमार, अविनाश लाम्बा हे उत्तराखंडातील लोकसंगीत सादर करणार आहेत. राम त्रियो हा विद्यार्थी सुफी संगीत सादर करणार आहे.
’कधी : दर शनिवारी सायं. ६ पासून
’कुठे : विविआना मॉल, पूर्व द्रुतगती मार्गालगत, ठाणे (प.)
‘झुंबा’मय व्हा!
फिटनेसच्या दुनियेत सध्या कोलंबियन ‘झुंबा’ हा व्यायाम प्रकार भलताच लोकप्रिय आहे. झुंबा या व्यायाम प्रकाराची सुरुवात अलबटरे पेरेझ या कोलंबियन नृत्य कलावंताने केली. झुंबा गोल्ड, झुंबा टोनिंग, अॅक्वा झुंबा आदी झुंबाचे प्रकार आहेत. ठाण्यातील ‘डान्स अॅन्ड लाइफ’ या संस्थेतर्फे आठवडय़ातील चार दिवस झुंबा या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शनिवार, ४ एप्रिल रोजी त्याविषयी मोफत परिचय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
कधी : शनिवार ४ एप्रिल सकाळी ९ ते १०
’कुठे : तालीम सभागृह-२, काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे
’संपर्क : आंचल गुप्ता : ९६१९२८८२४६.
’संकेतस्थळ : http://www.dancenlife.in
कैलास-मानसरोवर यात्रा- एक दृक्-श्राव्य कार्यक्रम
भूतलावरील स्वर्ग म्हणून ओळखली जाणारी यात्रा म्हणजे ‘कैलास-मानसरोवर’. कैलास-मानसरोवर यात्रेस प्रत्येकाला जायचा योग येतोच असे नाही. त्यामुळे कैलास-मानसरोवरास जाऊन आलेल्या एखाद्या व्यक्तीकडून प्रवासवर्णन ऐकायचा आनंद काही औरच. त्यात यात्रेतील दुर्मीळ छायाचित्रांची जोड असेल तर ती पर्वणीच. कैलास-मानसरोवर यात्रेचा दांडगा अनुभव असलेल्या आणि गेल्या सहा-सात वर्षांतील विविध यात्रेकरूंकडील सुमारे दोनशे छायाचित्रांचा संग्रह असलेल्या डॉ. वीणा लोंढे यांच्याशी कल्याणकरांना येत्या रविवारी संवाद साधता येणार आहे. कल्याण गायन समाज संचालित आणि म्हैसकर कला अध्यासन आयोजित ‘कैलास-मानसरोवर’ यात्रा या प्रवासवर्णनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. वीणा लोंढे कैलास-मानसरोवर यात्रेतील दुर्मीळ छायाचित्रे दाखवणार असून कैलास-मानसरोवर यात्रेला जाण्यासाठी घ्यावयाची काळजी, यात्रेतील अनुभव, मजेशीर किस्से या वेळी सांगणार आहेत.
’कधी : रविवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता
’कुठे : गायन समाजाचे पांडुरंग-प्रभा सभागृह, टिळक चौक, कल्याण पश्चिम
निसर्ग-पर्यटन स्थळांचे प्रतिमादर्शन
छायाचित्रणातून निसर्गछटा, प्राणिजीवन तसेच भारतातील पर्यटनस्थळे यांसारख्या विषयांना स्पर्श करणारे रानवाटा प्रस्तुत ‘आरंभ’ छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात निरनिराळ्या प्रकाराची ४०० छायाचित्रे ठाणेकरांना पाहता येणार आहेत. रसिक प्रेक्षकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत प्रदर्शन खुले राहणार आहे.
’कधी : ३ ते ५ एप्रिल
’कुठे : ठाणे कलाभवन, कापुरबावडी, ठाणे.
’संपर्क : स्वप्निल पवार ९८२१३६७८९४
संकलन : शलाका सरफरे