tvlog04ठाण्यातील बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात अकरावीत शिकणारी वैष्णवी गेजी या विद्यार्थिनीने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करून ‘स्टुडंट ऑफ दि इयर’चा मान मिळवला. खो-खो, कबड्डी, धावणे, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, थाळी फेक, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस आदि विविध स्पर्धा महाविद्यालयातर्फे घेतल्या जातात. यातील अनेक स्पर्धामध्ये वैष्णवी हिने चमकदार कामगिरी करीत स्पर्धेत यश मिळवले आहे. आजवर मुलींच्या या स्पर्धेत हा मान पदवी महाविद्यालयाकडे जात होता, मात्र यंदा वैष्णवीने तो कनिष्ठ महाविद्यालयाला मिळवून दिला. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते वैष्णवीला हा मान प्रदान करण्यात आला. अभ्यासाबरोबरच क्रीडास्पर्धामध्येही मुलींची वाखाणण्याजोगी कामगिरी पाहायला मिळत आहे. हे महिला सबलीकरणाचे पुढचे पाऊल आहे, असे मत महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. माधुरी पेजावर यांनी व्यक्त केले.

शोधिसी मंदिरी..
हिंदू संस्कृतीत प्राचीन काळात मंदिरे देवतांचा वास असलेले ठिकाण असे मानण्याची पद्धत होती. मंदिर उभारणीत वैविध्य होते. छोटय़ा मंदिरापासून तीन मजली मंदिरे बांधण्याची संकल्पनाही आहे. मग भव्य मंदिरे बांधण्याची कला रूढ झाली. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये अशा मंदिरांची उदाहरणे पाहता येतील. देवतांच्या वेगवेगळ्या रूपांमध्येही संकल्पना आहेत. शंकराची वेगवेगळी रूपे सांगितली आहेत. म्हणूनच त्यामागील सामाजिक संकल्पना शोधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर यांनी ठाण्यात केले.
विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वा. ना. बेडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष कार्यक्रम ठाण्यातील बेडेकर महाविद्यालयाच्या आवारात झाला. या वेळी इतिहास संशोधक प्रा. डॉ. अरविंद जामखेडकर यांचे व्याख्यान झाले. या वेळी इतिहास आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या देवळांच्या संकल्पनांचा आणि बांधणीचे रहस्य त्यांनी उलगडून दाखवले. अनेक राजवटींनी केलेला महत्त्व दिले. त्यामुळेच त्या बहरल्या. प्रगतिशील समाजाचे कलापूर्ण मंदिरे ही द्योतक होती. आज ही कलात्मकता शोधली पाहिजे. तिचा सूक्ष्म अभ्यास झाला पाहिजे. इतिहास, पुरातत्त्व आणि प्रतिमा विज्ञान या विषय जीवनाचा एक भाग आहेत. त्यांचा विकास झाला पाहिजे, अशी गरज त्यांनी या वेळी बोलून दाखवली.
उपासना पद्धतीचा विचार केला तर देवता पूजांचा संकल्पना खूप वेगवेगळ्या आहेत. प्राचीन काळी पूजा भिन्न पद्धतीने केल्या जात होत्या. तिच्यातले काही अंश आता राहिले आहेत. हाच धागा पकडून इतिहासातील तिचा संबंध
शोधता आला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांनी हे काम अत्यंत नेटाने आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

सुवर्ण कामगिरी
केरळमध्ये भरलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरातील सांस्कृतिक कार्यक्रमात बांदोडकर महाविद्यालयातील सिनिअर अंडर ऑफिसर अनिकेत क्षीरसागर याने रजत पदकाची कमाई केली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या या शिबिरात देशभरातून निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडवीत आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले. विजेत्या स्पर्धकांना महानिर्देशकांच्या हस्ते पदक बहाल करण्यात आले. बांदोडकर महाविद्यालयाच्या अनिकेत या अष्टपैलू विद्यार्थ्यांने कॅरम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. तसेच या शिबिरातही त्याने रजत पदकाची कमाई केली आहे, असे राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बिपिन धुमाळे यांनी सांगितले.

आम्ही मतदार
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कला माध्यमातून मतदान जनजागृती उपक्रम घेतला. महाविद्यालयात यावर नुकत्याच एक कार्यक्रम झाला.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी, पथनाटय़, वाद विवाद, वक्तृत्व, भित्तिपत्रके, घोषवाक्ये आदी कलांच्या माध्यमातून जनजागृती केली. यात कनिष्ठ महाविद्यालयातील सोहम बारी आणि धृती अय्यर या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, वाद-विवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तर पदवी महाविद्यालयातील सराफ सैय्यद हिने प्रथम क्रमांक पटकाविला. ठाणे तहसीलदारांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र बहाल करण्यात आले. यावेळी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सरदेसाई, अभिनेता संतोष जुवेकर, नाटय़दिग्दर्शक अशोक समेळ आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. डॉ. किरण पारिया, सांस्कृतिक विभागाचे प्रा. प्रकाश माळी, तसेच जागर जाणिवा अभियानाचे प्रा. अनिल आठवले, राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्रा. बिपीन धुमाळे, वाङ्मय मंडळाच्या समन्वयक प्रा. मंजिरी रानडे हे मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी प्रथमच पाच विभागाचे समन्वयक एकाच अभियानात एकत्रितपणे सहभागी झाले होते व त्यामुळेच इतके मोठे यश मिळाले असे मत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रा. आर. पी. आठल्ये यांनी यावेळी व्यक्त केले.

अभियंता कसे व्हाल?
प्रतिनिधी, ठाणे
उन्हाळ्याच्या सुट्टीत अभियांत्रिकी क्षेत्रातील माहिती मिळविण्यासाठी विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाने एक विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. यात विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी विभागाच्या विविध पैलूंची ओळख करून दिली जाईल. ९ मे रोजी विद्या प्रसारक मंडळाच्या इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स विभाग, दुसरा मजला, व्हीपीएम तंत्रनिकेतन येथे ही कार्यशाळा होणार आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येईल.
अभियांत्रिकीसाठीची पात्रता, खासगी शिकवणीची गरज, पदविका करावी की बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिकून त्यानंतर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश आणि रोजगाराच्या संधी अशा महत्त्वाच्या प्रश्नावर या कार्यशाळेत विशेषत्वाने चर्चा होईल, अशी माहिती महाविद्यालयाच्या इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या प्रमुख प्रा. कीर्ती आगाशे यांनी दिली. पदविका अभ्यासक्रमात तंत्रज्ञानासाठी आवश्यक हस्तकौशल्य आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव घेण्याची संधी दिली जाते. दहावीनंतर केवळ तीन वर्षांतच विद्यार्थ्यांना नोकरी वा स्वत:चा व्यवसाय सुरू करता येऊ  शकतो. मुलांना शालेय प्रयोगांसाठीची प्राथमिक माहिती देण्यात येईल. इयत्ता आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांसाठी चार सत्रांत कार्यशाळा होईल. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. के. नायक आणि कीर्ती आगाशे यांच्यासोबत तज्ज्ञ असतील. अखेरच्या सत्रात विद्याप्रसारक मंडळाच्या परिसरात हवामान विभागाने उभारलेल्या वेधशाळेला भेट दिली जाईल. संपर्क- २५३३९८६६