महाराष्ट्रीय संगीत परंपरेतील एक सुरेल पर्व अशी ख्याती असलेल्या पं. जीतेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे शिष्य रघुनाथ फडके आणि उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, २६ मार्च रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प) येथे एक खास मैफल आयोजित करण्यात आली आहे. या मैफलीत वीणा सावले, प्रचला आमोणकर, ऋषीकेश बडवे, ऋषीकेश बोडस आणि रघुनाथ फडके हे गायक कलावंत सहभागी होणार आहेत. त्यांना मकरंद कुंडले (ऑर्गन), जयंत फडके (हार्मोनियम), साई बँकर, किशोर तेलवणे (तबला), राजेंद्र भावे (व्हायोलिन), गुरुनाथ घरत (पखवाज), राजन पित्रे (तालवाद्य) हे साथ करणार आहेत. दिनेश आडावदकर, ऋतुजा फडके आणि दीपाली केळकर सूत्रसंचालन करणार आहेत. आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद अस्लम खान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पं. डॉ. विद्याधर व्यास यांचा सत्कार केला जाणार आहे. ‘कटय़ार.’ चित्रपटामुळे नव्या पिढीवरही अभिषेकी सुरांचे गारूड आहे. या मैफलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भावनाटय़गीतांची मेजवानीच रसिकांना मिळणार आहे.
कधी-शनिवार, २६ मार्च, संध्याकाळी- ५.३० वाजता
कुठे, सहयोग मंदिर, घंटाळी, ठाणे (प)

तज्ज्ञांकडून नृत्याचे धडे
नृत्याची आवड असणारी प्रत्येक व्यक्ती एखाद्या संधीच्या कायम शोधात असते. संधी मिळाली की ताल धरायचा असा त्यांचा छंद असतो. अशा प्रकारे बेधुंद होऊन तालावर थिरकण्याची मजा काही औरच आहे. काहीजण या नृत्यशैलीत शास्त्रोक्त शिक्षण घेऊन पारंगत असतात तर काहींना नृत्यपद्धतीत सतत नव्याने अस्तित्वात येणाऱ्या नृत्यप्रकार शिकण्याचे आकर्षण असते. हे नृत्यप्रकार आपल्या आवडत्या नृत्य कलाकारांसोबत शिकण्याची संधी येत्या आठवडय़ात उपलब्ध झाली आहे. रायझिंग स्टार डान्स वर्कशॉप या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कार्यशाळेत स्लो मोशन किंग म्हणून ओळखला जाणारा राघव जुयल आणि सुशांत पुजारी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागाबद्दल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. संपर्क : ९८३३९१०१८९.
कधी – २५ ते २७ मार्च
कुठे – न्यू हॉरिझोन स्कॉलर स्कूल, रिजेन्सीसमोर, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे (प.)

छायाचित्रणाची दुनिया निराळी
छायाचित्रणासारखे माध्यम म्हणजे क्षणाचा खेळ मानला जातो. समोर असलेला क्षण कॅमेऱ्यात अचूक टिपता आला तर खऱ्या अर्थाने छायाचित्रकाराला आपण काढलेले छायाचित्र अचूकपणे टिपल्याचे समाधान मिळते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळे छायाचित्र प्रकार पाहण्याची संधी मिळणार आहे. पोट्र्रेट, पारंपरिक पोट्र्रेट, पर्यावरण पोट्र्रेट, वेडिंग पोर्ट्रेट अशा विविध प्रकारांत काढलेले छायाचित्र पाहण्याची संधी मिळणार आहे. छायाचित्रकार धनेश पाटील आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या काही निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
कधी – २५ ते २७ मार्च
कुठे – खुले कलादालन, अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पू.)

गझलांची ‘वजाबाकी’
मनात सुरू असणाऱ्या आशा-निराशेच्या हिंदोळ्यांना स्थिर ठेवण्यासाठी शब्दांची मदत होते. या शब्दातून कविता नंतर गाणी आणि गाण्यांमधूनच गझल तयार होते. अशाच काही खास गझलांचा नजराणा ठाणेकरांसाठी ‘दमयंती फाऊंडेशन’नेआयोजित केला आहे. मराठीतील नामवंत गजलकारांची लिहिलेल्या आणि रफिक शेख यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘वजाबाकी’ या मराठी गजल आल्बमचे प्रकाशन शनिवार, २६ मार्च, रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे. ‘वजाबाकी’ या कार्यक्रमाची संकल्पना अ‍ॅड. संदीप डोंगळे, प्रकाश जालिहाळकर यांची असून रफिक शेख, पूजा गायतोंडे हे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. मनोहर रणपिसे, इलाही जमादार, डॉ. राम पंडित, बंदीउज्जमा बिराजदार, फातिमा मुजावर, संदीप आदी गझलकारांच्या गझला सादर होणार आहेत.
क धी- शनिवार, २६ मार्च, वेळ-सायंकाळी ८.३० वाजता
कुठे- गडकरी रंगायतन, ठाणे

शाम ए गझल.

ठाणेकरांच्या वीकेण्डमध्ये रंग भरण्यासाठी नाद या संस्थेतर्फे ‘शाम -ए-गझल’ या गीत गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २५ मार्च रोजी रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गझल गायकांच्या गाजलेल्या गजलांचा सुमधुर नजराणा खास ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये श्रीरंग टेंबे आणि नेहा नामजोशी हे गायक कलाकार, तसेच अथर्व कुलकर्णी (तबला), डॉ. हिमांशू गिंडे (हार्मोनियम ), शलाका देशपांडे(व्हायोलिन), अनिल गावडे (ढोलक), निरंजन कर्डे(की-बोर्ड) आदी कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी लिमये करणार आहेत.
कधी- शुक्रवार, २५ मार्च, वेळ- रात्री ८.३० वा.
कुठे-डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, मिनी थिएटर, ३ रा मजला, हिरानंदानी मेडोस्, ठाणे (प.)

वाद्यांचा त्रिवेणी संगम
कंठीय स्वरांप्रमाणेच निरनिराळ्या वाद्यांतून निघणारे स्वरसंगीतही रसिकांच्या विशेष आवडीचे असते. अशीच एक वाद्यसंगीताची मैफल येत्या रविवारी ब्रह्मांड कट्टय़ावर अनुभवता येणार आहे. विवेक सोनार (बासरी), चारुदत्त नायगांवकर (सतार) आणि कालिनाथ मिश्रा (तबला) अशा वाद्यसंगीताचा त्रिवेणी संगम कट्टय़ावर रंगणार आहे.
कधी-रविवार,२७ मार्च, वेळ- सायंकाळी ६ वाजता
कुठे-सांजस्नेह ज्येष्ठ नागरिक हॉल, ब्रह्मांड चौकीमागे, आझाद नगर ठाणे

कुल कुल्फी.
उन्हाळ्याची चाहूल लागताच खवय्यांचे पाय आपसूकच आईस्क्रीम पार्लरकडे वळतात. परंतु आता खवय्यांना आईस्क्रीम पार्लरकडे पळावे लागणार नाही, कारण आता घरच्या घरी आईस्क्रीमचा पारंपरिक प्रकार म्हणजेच ‘कुल्फी’ बनविण्याचे प्रशिक्षण कोरम मॉलतर्फे देण्यात येणार आहे. कोरम मॉल व्यवस्थापनातर्फे खास महिलांसाठी वुमन्स ऑन वेन्सडे हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाअंतर्गत यावेळी खास ‘कुल्फी’ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये रोस् कुल्फी, मटका कुल्फी, गुलकंद यांसारखे अनेक कुल्फीच्या प्रकाराचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
कधी- बुधवार, ३० मार्च, वेळ-दुपारी ३ ते रात्री ८ वाजता.
कुठे- कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ, ठाणे (प.)

शस्त्रांचे प्रदर्शन
शाळेत पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासता येतो. यात महाराजांचा पराक्रम, गनिमी काव्याची नीती सांगितली जाते. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, त्यांचे युद्धकौशल्य, त्यांनी वापरलेले शस्त्रे याची ओळख आजच्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना असतेच असे नाही. त्यामुळे ही ओळख व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन कल्याण येथे भरविण्यात आले आहे. त्या काळातील तलवारी, भाले, ढाल, दानपट्टे आदी पुरातन शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन कल्याण येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शुक्रवार, २५ मार्च ते रविवार, २७ मार्च या कालावधीत सकाळी १० ते रात्री १०.०० या वेळेत अभिनव विद्या मंदिर, पारनाका, कल्याण (प.) येथे भरविण्यात येणार आहे.
कधी- २५ ते २७ मार्च, वेळ-सकाळी १० ते रात्री १०.००
कुठे- अभिनव विद्या मंदिर, पारनाका, कल्याण (प.)