ठाणे : राज्यात बेरोजगार तरुणांना नोकरीचे स्वप्न दाखवून त्यांची आर्थिक फसवणुक करण्याचे प्रकार घडत असतानाच, राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाचे चिन्ह वापरून बनावट ॲप तयार करून तरुणांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर गैरप्रकाराकडे आमदार ॲड. निरंजन डावखरे ( Niranjan Davkhare ) यांनी लक्ष वेधले, तर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत पोलिसांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानपरिषद आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या या गंभीर गैरव्यवहारासंदर्भात सभापती प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील विधान भवन येथे मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह विभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, पोलीस उप आयुक्त बजरंग बनसोडे, सायबर विभागाचे प्रविण बनगोसावी उपस्थित होते. मात्र, राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभापतींनी नाराजी व्यक्त केली. यावेळी परिस्थितीचा आढावा घेऊन सभापतींनी संबंधित विभागांना स्पष्ट आदेश दिले की, “पुढील १५ दिवसांच्या आत अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही ठरवावी.”
टोळ्यांचे पोलीसांशी संगनमत ?
राष्ट्रीय कौशल्यविकास महामंडळाचे चिन्ह वापरुन असे बनावट ॲप तयार केले जातात. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ॲपद्वारे पैसे उकळले जातात. काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तरुण पोलीसात तक्रार दाखल करायला जातात त्यावेळी त्यांना ताटकळत ठेवले जाते, तक्रार दाखल करुन घेतली जात नाही. बनावट ॲप चालवणाऱ्या टोळ्यांचे पोलीसांशी संगनमत असण्याची शक्यता आहे, असे मुद्दे आमदार निरंजन डावखरे यांनी बैठकीत उपस्थित केले.
कृती आराखडा तयार करा
राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलीसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांनी पुढील १५ दिवसांत आमदार डावखरे आणि सर्व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन ठोस, वेळबद्ध आणि अंमलात येणारा कृती आराखडा तयार करावा, असे निदेश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.
