लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: पोलीस भरतीची लेखी परिक्षा देण्यासाठी मूळ उमेदवाराऐवजी बोगस तरुण आल्याचा गंभीर प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी बोगस उमेदवार विकास जौनवाल आणि मूळ उमेदवार बालाजी कुळसकर यांच्याविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विकास याला अटक केली आहे. तसेच बालाजी याच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. लेखी परिक्षा देण्यासाठी बालाजी हा विकासला २० हजार रुपये देणार होता अशीही माहिती समोर येत आहे.

पोलीस भरती प्रक्रिया राज्यात ठिक-ठिकाणी सुरू आहे. रविवारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदासाठी आलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यात येणार होती. त्यामुळे राज्यभरातून उमेदवार लेखी परिक्षा देण्यासाठी ठाणे शहरातील परिक्षा केंद्रांवर आले होते. दरम्यान, राबोडी येथील परिक्षा केंद्रावर पोलिसांच्या पथकाने उमेदवारांची तपासणी सुरु केली असता, एका उमेदवाराकडे मोबाईल, स्मार्टवॉच, ब्यूटूथ व संपर्क साधण्यासाठी लागणारी इलेक्ट्रीक वस्तू आढळून आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याचे नाव विकास असल्याचे सांगितले. तो छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून बीड येथे वास्तव्यास असलेल्या बालाजी कुसळकर या उमेदवारासाठी परिक्षा देण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात विकास आणि बालाजी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विकासला अटक केली आहे. तर बालाजी विरोधात कारवाई सुरु झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बालाजी हा विकासला लेखी परिक्षा देण्यासाठी २० हजार रुपये देणार होता. यातील १० हजार रुपये त्याने दिले होते. तर उर्वरित १० हजार रुपये तो परिक्षा झाल्यानंतर देणार होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.