ठाणे – माथाडी कामगार संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करून एका व्यावसायिकाकडून ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला ठाणे शहराच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात अटक केली आहे.घनश्याम सिताराम नाईक ( ५२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो पनवेल येथील कळंबोली परिसरात राहणारा आहे.

घनशामने व्यावसायिकाला माथाडी संघटनेचा पदाधिकारी असल्याचे भासवत, ठाणे आणि मुंबईतील एका कंपनीच्या साईटवर माल पोहोचवणाऱ्या प्रत्येक वाहनामागे ३ हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली होती. हा हप्ता दिला नाही तर, मालाची वाहतूक आणि साईटवरील काम बंद पाडण्याची धमकीही दिली. यानंतर तडजोडीच्या नावाखाली त्याने ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. व्यवसायिकाने या प्रकरणी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर येथे तक्रार दाखल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून घनश्यामला ५ लाख रूपये खंडणी स्विकारतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भुषण कापडणीस (खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर) हे करीत आहेत. आरोपी घनश्याम नाईक याने अशाच प्रकारे आणखीन कोणाकडून खंडणी वसुली केली आहे याचा पोलीस तपास घेत आहेत.